निरोगी किडनीसाठी रक्तदाब अन् मधुमेह नियंत्रित ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 08:08 IST2026-03-12T08:03:45+5:302026-03-12T08:08:07+5:30
किडनी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून पाण्याचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अशी अनेक महत्त्वाची कामे या अवयवाच्या माध्यमातून होतात.

निरोगी किडनीसाठी रक्तदाब अन् मधुमेह नियंत्रित ठेवा!
डॉ जतीन कोठारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दरवर्षी मार्च महिन्यात जागतिक स्तरावर जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश किडनीच्या आजारांविषयी जनजागृती करणे आणि लोकांना मूत्रपिंडाचे आरोग्य जपण्याचे महत्त्व समजावून सांगणे हा आहे. दरम्यान,सर्वांसाठी किडनी आरोग्य : लोकांची काळजी, पृथ्वीचे संरक्षण. ही २०२६ साठीची संकल्पना आहे.
या संकल्पनेतून प्रत्येकापर्यंत योग्य आरोग्यसेवा पोहोचवणे, किडनीच्या आजारांचे लवकर निदान करणे यावर भर दिला आहे. किडनी शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून पाण्याचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अशी अनेक महत्त्वाची कामे या अवयवाच्या माध्यमातून होतात.
१. पुरेसे पाणी प्या : दिवसभरात सुमारे २ ते २.५ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. यामुळे किडनीला विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते आणि मूत्रपिंडात खडे (स्टोन) होण्याची शक्यता कमी होते.
२. रक्तदाब नियंत्रणात ठेवा : उच्च रक्तदाबामुळे किडनीतील सूक्ष्म फिल्टर खराब होऊ शकतात. त्यामुळे रक्तदाब १३०/८० च्या आसपास असावा.
३. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा : मधुमेह किडनीच्या आजाराचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवावी.
४. मिठाचे सेवन कमी करा : दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ सेवन करावे. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो.
५. वेदनाशामक औषधे टाळा: वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ वापर किडनीसाठी घातक ठरू शकतात.
६. योग्य वजन राखा : लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे संतुलित आहार व नियमित व्यायाम हवा.
७. नियमित व्यायाम करा : ४ ते ५ दिवस किमान ३० ते ४५ मिनिटे चालणे, सायकलिंग आरोग्यासाठी लाभदायक.
८. सप्लिमेंट्स सावधगिरीने वापरा : काही सप्लिमेंट्स किंवा काही हर्बल औषधांत किडनीना हानी पोहोचवणारे घटक असू शकतात.
९. धूम्रपान टाळा, मद्यपान मर्यादित: धूम्रपानामुळे किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि मूत्रपिंडाचे नुकसान होण्याचा धोका वाढतो.
१०. नियमित तपासणी करा : मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास असल्यास नियमित सीरम क्रिएटिनिन, लघवीतील प्रथिने व रक्तदाब तपासणी करणे आवश्यक.