जयपूर : प्राचीन भारतीय परंपरेत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला शंख फुंकण्याचा व्यायाम आता आधुनिक वैद्यकशास्त्रातही नवी दिशा दाखवत आहे. जयपूरच्या इटर्नल हॉस्पिटलने केलेल्या संशोधनात, नियमित शंखवादनाने घोरणे आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅपनिया (ओएसए) यांसारख्या झोपेतल्या विकारांची तीव्रता कमी होऊ शकते, असे वैज्ञानिक प्रमाण मिळाले आहे.
काही रुग्णांना तर दीर्घकाळ लागणाऱ्या सीपीएपी श्वसनयंत्राची गरजच उरलेली नाही, असेही निष्पन्न झाले. हा जगातील पहिला रॅण्डमाइज्ड कंट्रोल्ड ट्रायल असून, याचे निष्कर्ष युरोपियन रेस्पिरेटरी जर्नल ओपन रिसर्चमध्ये नुकतेच प्रसिद्ध झाले.
स्नायूंना मिळते मजबुतीचे बळ
शंख फुंकल्याने गळा, जीभ आणि श्वसनाशी संबंधित इतर स्नायू मजबूत होतात. त्यामुळे वायुमार्ग मोकळा राहतो आणि घोरणे तसेच स्लीप ॲपनियाचा धोका कमी होतो. संशोधकांच्या गटाने २०१८ मध्येच ही संकल्पना मांडली होती की शंख वादनालाही इतर वायुवाद्य यंत्रांसारखे आरोग्य लाभ मिळू शकतात. सध्या लखनऊच्या केजीएमयू येथे या पद्धतीमुळे स्नायूंमध्ये होणारे बदल अभ्यासणारे सविस्तर संशोधन सुरू आहे.
महागड्या उपचार पद्धतींना पर्याय
आयुर्वेदात शंखवादन फुप्फुसांची क्षमता, मानसिक एकाग्रता आणि सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. महागड्या उपचार पद्धतींना हा किफायतशीर आणि सहज उपलब्ध पर्याय ठरू शकतो, विशेषतः ज्यांना सीपीएपी यंत्राचा दीर्घकालीन वापर शक्य नाही त्यांच्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.
३० रुग्णांवर सहा महिन्यांचा अभ्यास
या अभ्यासात मध्यम स्वरूपाच्या ओएसए असलेल्या ३० रुग्णांना दोन गटांत विभागले. पहिल्या १४ रुग्णांना दिवसातून २ दोन वेळा १५ मिनिटे शंख फुंकण्याचे प्रशिक्षण दिले. उर्वरित १६ जणांना खोल श्वसनाचे व्यायाम करून घेण्यात आले.
सहा महिन्यांनंतर, शंखवादन करणाऱ्या गटात दिवसा अवेळी येणारी झोप ३४ टक्क्यांनी घटली आणि रात्रीच्या झोपेची गुणवत्ता सुधारली. तसेच झोपेत श्वास रोखल्या जाण्याच्या, घोरण्याच्या सवयीतही घट झाल्याचे आढळले.