चिंता से घटे चतुराई... एन्झायटी फेका खड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:49 IST2025-11-09T14:48:20+5:302025-11-09T14:49:17+5:30
anxiety : ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने चिंतारोगाचा (एन्झायटी) त्रास असल्याचे सांगितले. हा आजार मानसिक आरोग्याशी निगडित सर्वात सामान्य समस्या आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी अशा सर्वांनाच काही ना काही कारणांमुळे बेचैनी, घबराट किंवा अस्वस्थता जाणवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य जाणीव, शिस्त आणि स्वतःची काळजी घेतल्यास त्यावर सहज नियंत्रण मिळविता येते.

चिंता से घटे चतुराई... एन्झायटी फेका खड्यात
-डॉ. सपना नायक-बांगर
(मानसोपचार तज्ज्ञ)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेल्या मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्जने चिंतारोगाचा (एन्झायटी) त्रास असल्याचे सांगितले. हा आजार मानसिक आरोग्याशी निगडित सर्वात सामान्य समस्या आहे. विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, गृहिणी अशा सर्वांनाच काही ना काही कारणांमुळे बेचैनी, घबराट किंवा अस्वस्थता जाणवते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार योग्य जाणीव, शिस्त आणि स्वतःची काळजी घेतल्यास त्यावर सहज नियंत्रण मिळविता येते.
चिंता (एन्झायटी) म्हणजे काय? : मानसोपचार
तज्ज्ञांच्या मते, चिंता ही तणावावर शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. काही अनिश्चित गोष्टींबद्दल भीती वाटणे, हे सामान्य आहे, पण जेव्हा ही भावना सतत राहते आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणते, तेव्हा ती गंभीर बनते. याबाबत संकेत ओळखा. खूप वेगाने विचार येणे, हृदयाचे ठोके वाढणे, एकाग्र न होणे ही लक्षणं आहेत.
स्वीकारा आणि समजून घ्या : चिंतेवर मात करण्याचे
पहिले पाऊल म्हणजे ती मान्य करणे. ती लपवण्याऐवजी स्वतःला "हो, मला चिंता आहे आणि ते ठीक आहे," असे सांगणे महत्त्वाचे. स्वीकारल्याने भीती कमी होते आणि मन हलके होते.
श्वसन व ध्यान : दीर्घ श्वसनाचे सोपे व्यायाम चिंता
कमी करण्यास मदत करतात. खोल श्वास घेतल्याने शरीर शांत होते. ध्यान आणि माइंडफुलनेस तंत्र आज जगभर लोकप्रिय आहेत. मोबाइल अॅप्स किंवा ऑनलाइन क्लासेसमुळे हे शिकणे सोपे झाले आहे.
संतुलित जीवनशैली : चांगला आहार, पुरेशी झोप
आणि नियमित व्यायाम हे मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत.
आहार : फळे, भाज्या आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ मेंदूसाठी चांगले.
हे टाळा : कॅफिन आणि साखरेचे जास्त सेवन.
व्यायाम : रोज ३० ते ४५ मिनिटे चालल्याने शरीरात 'हॅपी हार्मोन्स' तयार होतात.
झोप : दररोज किमान सात तासांची चांगली झोप चिंता कमी करते.
डिजिटल ताण टाळा : सतत मोबाइल वापरणे किंवा बातम्या पाहणे मनावर अतिरिक्त ताण आणते. त्यामुळे 'डिजिटल सीमारेषा' ठरवा, म्हणजे ठरावीक वेळेतच मोबाइल वापरा. मनालाही माहितीपासून विश्रांती हवी असते. काही तास डिजिटल जगापासून दूर राहणे हे स्वतःची काळजी घेण्याचा भाग आहे.
सतत चिंता वाटत असेल आणि आयुष्यावर परिणाम करत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी, समुपदेशन किंवा आवश्यकतेनुसार औषधोपचार हे उपचार प्रभावी ठरतात. आता काही शहरांतील मानसिक आरोग्य केंद्रे ऑनलाइन सल्लाही देतात.