११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 08:17 IST2025-11-06T08:17:25+5:302025-11-06T08:17:48+5:30
मुंबईतील ‘जीटी’चा समावेश; राज्य सरकारची परवानगी

११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही वर्षांत हृदयविकाराचे प्रमाण वेगाने वाढत असल्यामुळे या आजारावरील उपचाराकरिता आवश्यक असणारी कार्डियाक कॅथलॅब राज्यातील ११ वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांत सुरू करण्यात येणार आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर या कॅथलॅब सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यात मुंबईतील गोकुळदास तेजपाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे.
काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत येणाऱ्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या मोठी असते. त्या ठिकाणी दोन कॅथलॅब सुरू करण्यात आल्या आहेत. पीपीपी तत्त्वावर काढण्यात येणाऱ्या कॅथलॅबमध्ये कार्डियाक कॅथलॅब युनिट, ॲनेस्थेशिया वर्क स्टेशन, इको मशीनसह इतर उपकरणांचा समावेश असेल.
या पीपीपी प्रकल्पाचा कालावधी १५ वर्षांचा राहील तसेच शासनाच्या पूर्वमान्यतेने तो कमाल पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल. सार्वजनिक-खासगी भागीदारीमध्ये खासगी सेवा पुरवठा दाराकडून कॅथलॅब युनिटसाठी आवश्यक असणारी खरेदी, स्थापना तसेच सर्व संबंधित पायाभूत सुविधा उभारणीसाठी भांडवली गुंतवणूक करेल. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा, वीज, पाणी, ऑक्सिजन पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा संबंधित संस्था उपलब्ध करून देईल.
राज्यातील ‘ती’ महाविद्यालये कोणती?
- गोकुळदास तेजपाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मुंबई)
- स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (अंबाजोगाई)
- श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (धुळे)
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर)
- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नांदेड)
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गोंदिया)
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मिरज)
- आरोग्य पथक (पालघर)
- छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सातारा)
- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (यवतमाळ)
- बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (पुणे)