डॉ. संजय बोरुडेस्थूलत्व शल्य चिकित्सक
सध्याच्या जीवनशैलीमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक विविध मार्गांचा अवलंब करतात. डाएट, व्यायाम, सर्जरीनंतर आता औषधोपचाराकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत वजन कमी करण्यासाठी काही औषधे बाजारात आली असून, काही गोळ्या व इंजेक्शन्स यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही औषधे घेताना अज्ञान आणि चुकीच्या अपेक्षा धोकादायक ठरू शकतात.
कोणत्या औषधांचा वापर होत आहे?
सध्या बाजारात वजन कमी करण्यासाठी जीएलपी-१ वर्गातील इंजेक्शन स्वरूपात मिळणारी औषधे मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. याशिवाय काही गोळ्यादेखील उपलब्ध आहेत. ही औषधे मेंदूतील भूक नियंत्रक केंद्रावर परिणाम करून भूक कमी करतात. तसेच अन्नपचन मंदावतात आणि एकंदरच त्यामुळे कॅलरीचे सेवन कमी होते, तर काही औषधे शरीरातील इन्सुलिनच्या क्रियेतही सुधारणा करतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आकडेवारी काय सांगते..
वैद्यकीय क्षेत्रातील आघाडीच्या लॅन्सेटच्या जर्नलच्या अभ्यासानुसार, २०२५ मध्ये भारतात २० वर्षांवरील ४४ दशलक्ष महिला आणि २६ दशलक्ष पुरुष भारतात लठ्ठ आहेत. १९९० मध्ये हे प्रमाण महिलांमध्ये २.४ दशलक्ष आणि पुरुषांमध्ये १.१ दशलक्ष इतके होते.
औषध कोणासाठी योग्य?
वजन कमी करण्याची ही औषधे बीएमआय ३० किंवा वजनाशी संबंधित आजार (उदा. डायबेटिस, उच्च रक्तदाब, हृदयरोग) असलेल्या रुग्णांसाठी वापरली जातात. म्हणजेच, सौंदर्याच्या उद्देशाने वजन कमी करायचे म्हणून ही औषधे घेणे योग्य नाही.
खर्च आणि उपलब्धता
वजन कमी करणाऱ्या इंजेक्शनचा खर्च प्रतिमहिना १४,०० ते २७,००० रुपये असून, आयुष्यभर तो करावा लागतो. काही अभ्यासात, औषधे बंद केल्यावर वजन परत वाढणे, इतर आजार पुन्हा होत असल्याचे आढळले आहे.
दुष्परिणाम आणि धोके
आजकाल ही औषधे ऑनलाइन किंवा फार्मसीमध्ये सहज मिळतात, त्यामुळे अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषध सुरू करतात. हे अतिशय घातक आहे. या औषधांमुळे काही सामान्य दुष्परिणाम दिसून येतात, त्यामध्ये मळमळ, उलटी, पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या आजाराचा समावेश आहे. तसेच दीर्घकालीन वापरामुळे पचन संस्थेवर ताण येतो. काही परदेशातील अभ्यासांमध्ये पँक्रियाटायटिस, थायरॉइड ग्रंथीचे त्रास, मूड स्वींग तसेच किडनीवर ताण असे धोकेही अधोरेखित झाले आहेत.
Web Summary : Weight loss drugs, including injections, are gaining popularity. However, these medications can have side effects like nausea and constipation. Long-term use may cause pancreatic and thyroid issues. Use only under medical supervision due to potential risks.
Web Summary : वजन घटाने की दवाएं, जिनमें इंजेक्शन भी शामिल हैं, लोकप्रिय हो रही हैं। हालांकि, इन दवाओं के दुष्प्रभाव हो सकते हैं जैसे मतली और कब्ज। लंबे समय तक उपयोग से अग्नाशय और थायरॉयड की समस्याएं हो सकती हैं। संभावित जोखिमों के कारण केवल चिकित्सा पर्यवेक्षण के तहत उपयोग करें।