जि.प.चे राजकारण बदलणार, ६ जागा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST2022-05-06T05:00:00+5:302022-05-06T05:00:06+5:30
मिनी मंत्रालयातून पुढे आमदार, खासदार आणि मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मिनी मंत्रालयाचे स्वरुप अधिक मोठे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३वरुन ५९, तर पंचायत समिती गणाची संख्या १०६वरुन ११८ होणार आहे. हा नवीन नियम लागू झाल्यास जिल्हा परिषदेत सहा सदस्य वाढतील, तर पंचायत समितीत १२ सदस्य वाढतील.

जि.प.चे राजकारण बदलणार, ६ जागा वाढणार
अंकुश गुंडावार
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. जिल्हा विकासाच्या दृष्टिकोनातून या मिनी मंत्रालयाला फार महत्त्व आहे. याच मिनी मंत्रालयातून पुढे आमदार, खासदार आणि मंत्री झाल्याची उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे या मिनी मंत्रालयाचे स्वरुप अधिक मोठे करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. नवीन नियमानुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३वरुन ५९, तर पंचायत समिती गणाची संख्या १०६वरुन ११८ होणार आहे.
हा नवीन नियम लागू झाल्यास जिल्हा परिषदेत सहा सदस्य वाढतील, तर पंचायत समितीत १२ सदस्य वाढतील. त्यामुळे क्षेत्र वाढल्यास कोणत्या तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र वाढेल, लोकसंख्येचे प्रमाण काय राहील, हे महत्त्वपूर्ण असणार आहे.
सध्या एक जिल्हा परिषद क्षेत्र १५ हजार मतदारांचे आहे. त्यामुळे नवीन नियम लागू झाल्यास किती लोकसंख्येचे एक क्षेत्र राहील, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात सर्वात मोठे जि. प. क्षेत्र गोंदिया तालुक्यात आहे. १४ जि. प., तर २८ पंचायत समिती गण याच तालुक्यात आहेत.
त्यामुळे याच तालुक्यातील विजयी होणाऱ्या उमेदवारांवरुन जि. प.च्या सत्तेचे समीकरण ठरविले जाते. हे सर्व प्रस्तावित असून, याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही.
गोंदिया जिल्हा परिषदेची निवडणूक तीन महिन्यांपूर्वी पार पडली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
लोकसंख्येतील वाढ किती,त्यावर ठरणार गट
सन २०११च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १४ लाख ५३ हजार आहे. यात पुन्हा किती वाढ झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनगणना झाल्यानंतर लोकसंख्येत नेमकी किती वाढ झाली, हे स्पष्ट होणार आहे. २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्यांचा आधार घेण्यात आला.
गट कुठे किती वाढणार
सध्या जिल्ह्यात सर्वाधिक जि. प. आणि पंचायत समिती क्षेत्र गोंदिया तालुक्यात आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारावर गटांचा विचार झाल्यास गोंदिया तालुक्यात पुन्हा तीन गट वाढण्याची शक्यता असून, तीन गट वाढल्यास पंचायत समितीच्या गणात ६ने वाढ होईल. तिरोडा, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव व देवरी क्षेत्रातील गटामध्ये वाढ होऊ शकते.
पुढील निवडणुकीत होणार अंमलबजावणी
- गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक २१ डिसेंबर २०२१ रोजी पार पडली. त्यामुळे शासनाच्या विचाराधीन असलेला हा प्रस्ताव पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत लागू होण्याची शक्यता आहे.
जिल्हाप्रमुख काय म्हणतात
जि. प. आणि पं. स.मध्ये जागा वाढल्यास मतदारसंघ लहान होतील. त्यामुळे सदस्यांनासुध्दा जास्तीत जास्त मतदारांच्या संपर्कात येता येईल. शिवाय क्षेत्राच्या विकासाला गती देण्यास मदत होईल.
- गंगाधर परशुरामकर,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
नवीन नियमांची अंमलबजावणी झाल्यास जि. प.चे सहा गट आणि पं. स.चे बारा गण वाढणार आहेत. यामुळे सध्या असलेले मतदारसंघ लहान होऊन सदस्यांनासुध्दा क्षेत्राचा विकास करण्यास मदत होईल.
- दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागा वाढविण्याचे आता केवळ शासनाच्या विचाराधीन आहे. पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आताच याचे काय फायदे होतील हे बोलणे योग्य होणार नाही.
- केशव मानकर, जिल्हाध्यक्ष, भाजप