परिमंडळाचा कारभार वाऱ्यावरच
By Admin | Updated: December 14, 2015 02:10 IST2015-12-14T02:10:19+5:302015-12-14T02:10:19+5:30
गोंदियाला परिमंडळाचा दर्जा देऊन महावितरणने एकप्रकारे लॉलीपॉपच दिल्याचे दिसून येत आहे.

परिमंडळाचा कारभार वाऱ्यावरच
कपिल केकत गोंदिया
गोंदियाला परिमंडळाचा दर्जा देऊन महावितरणने एकप्रकारे लॉलीपॉपच दिल्याचे दिसून येत आहे. कारण नवनिर्मित गोंदिया परिमंडळाला लागणाऱ्या सुविधांची पूर्तता तर करण्यात आलेली नाहीच. शिवाय अन्य परिमंडळांना मंजूर करण्यात आलेल्या मनुष्यबळाच्या अर्ध्यापेक्षा कमी मनुष्यबळ गोंदिया परिमंडळाला देण्यात आले आहे. याचा परिणाम मात्र दैनंदिन कामकाजावर दिसून येत असून येथील कारभारच वाऱ्यावर असल्याचे दिसून येते.
विदर्भातील वीज कंपनीच्या कामात सुसुत्रता यावी या उद्देशातून महावितरणने २ आॅक्टोबर रोजी गोंदिया-भंडारा, चंद्रपूर-गडचिरोली व अमरावती- अकोला असे तीन परिमंडळ तयार केले. यात गोंदिया-भंडारा मिळून तयार करण्यात आलेल्या परिमंडळाचे कार्यालय गोंदियात देण्यात आले आहे. परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून बी.के.जनवीर यांनी २१ सप्टेंबर रोजी आपला पदभार स्वीकीरला. तर परिमंडळाचा दर्जा वाढविण्यात आल्याने वाढलेल्या कारभारासाठी कर्मचारी वर्ग देण्यात आला आहे. मात्र या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे प्रशस्त कार्यालय अद्याप लाभलेले नाही. परिणामी परिमंडळ कार्यालयाचा कारभार सध्या महावितरणच्या रामनगर कार्यालयातूनच चालविला जात आहे.
रामनगर कार्यालयातील एका हॉलमध्येच पार्टीशन करून मुख्य अभियंता जनवीर व त्यांच्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे परिमंडळाच्या कामकाजासाठी लागणारे मनुष्यबळ देण्यात गोंदिया परिमंडळासोबत सापत्न व्यवहार करण्यात आल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. त्याचे असे की, गोंदिया सोबतच चंद्रपूर परिमंडळ तयार करण्यात आले. त्यानंतर चंद्रपूरसाठी ७३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात आली आहे. परिमंडळ कार्यालयाच्या मापदंडाप्रमाणे गोंदियासाठी तेवढीच पदनिर्मिती करणे गरजेचे आहे. मात्र गोंदियासाठी फक्त ३१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात आली आहे. यात १४ अधिकारी-कर्मचारी रूजू झाले असून उर्वरीत १७ पदे आजही रिक्तच आहे. तर परिमंडळांतर्गत येणाऱ्या अनेक विभागांचा कारभार चंद्रपूर व नागपूर वरूनच बघण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कळले. मात्र त्या विभागांचे अधिकारी अद्याप गोंदियाकडे फिरकलेच नसल्याचीही माहिती आहे.
ग्राहकांना आपल्या कामकाजासाठी नागपूरच्या मुख्य कार्यालयात जाण्याची पाळी येऊ नये. त्यांना त्यांच्या जिल्ह्यातच सर्व सुविधा मिळाव्या व समस्यांचे निवारण व्हावे, तसेच या सर्व कामकाजात सुसुत्रता यावी या उद्देशातून महावितरणने परिमंडळ निर्मितीचा प्रयोग केला. हा प्रयोग वाखाणण्याजोगा असाच होता. मात्र परिमंडळ निर्मितीनंतर त्यांच्या कामाकाजासाठी लागणाऱ्या अन्य सुविधा व मनुष्यबळाच्या वितरणात होत असलेली सापत्न वागणूक मात्र येथील कारभारावर विरजन घालत आहे. बसायला धड जागा नाही, कामाच्या जागेवर सुविधा नाही, कामासाठी लागणारे पुरेपूर मनुष्यबळ नाही. अशा या फसतीत परिमंडळाचा कारभार धक्का मारत सुरू असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कित्येक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वाटेवर
गोंदिया परिमंडळ कार्यालयासाठी देण्यात आलेले काही अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत, तर काही सुट्टीवर गेल्याचे कळते. यात गोंदिया शहर विभाग अतिदक्षतेचे असताना सुद्धा विभागाला देण्यात आलेले कार्यकारी अभियंता येत्या दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणार आहेत. ग्राहक सेवा केंद्रातील अभियंता एका महिन्याने सेवानिवृत्त होणार आहेत. तसेच सहायक महाव्यवस्थापकांची नेमणूक करण्यात आल्यानंतर १५ दिवसांतच त्यांची इतरत्र बदली करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, कार्यकारी अभियंता (प्रशासन) हे हजर झाले व त्याच दिवशी वैद्यकीय सुटी टाकून ते निघून गेल्याचेही कळले. अशात बोटावर मोजण्या इतक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर किती तत्परतेने कारभार चालणार असा प्रश्न येथे पडतो.
ग्राहक संख्या कमी असल्याचा फटका
महावितरणच्या दृष्टीकोनातून गोंदिया-भंडारा परिमंडळात ग्राहक संख्या कमी असल्याने कमी मनुष्यबळ देण्यात आल्याचे कळले. येथे ग्राहक संख्या कमी असली तरी परिमंडळ निर्मिती केल्यानंतर सर्व विभाग व त्या सर्व विभागांचे कामकाज करावेच लागणार ही बाब स्पष्ट आहे. मात्र महावितरणने काही विभागांचा कारभार चंद्रपूर व नागपूर येथेच ठेवला आहे. यातून गोंदिया परिमंडळ निर्मिती एक लॉलीपॉपच दिसून येते. परिमंडळ केले आता मात्र मनुष्यबळ पुरविण्यात टोलवाटोलवी हा प्रकार मात्र समजण्यापलीकडचा आहे. परिमंंडळ निर्मिती झाल्याने काम वाढले त्याप्रमाणात मनुष्यबळ लागणारच ही बाब स्पष्ट आहे. मात्र मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे याचे दुष्परिणाम दैनंदिन कामकाजावर पडणार यात शंका नाही.