जि.प. शाळेची इमारत पाडली
By Admin | Updated: October 24, 2016 00:51 IST2016-10-24T00:51:04+5:302016-10-24T00:51:04+5:30
चिचोली येथील जि.प. शाळेची जुनी इमारत येथील काही समाजकंठकांनी जेसीबी लावून प्रजासत्ताक दिनी पाडली.

जि.प. शाळेची इमारत पाडली
चिचोली येथील प्रकरण : कारवाई करण्याची मागणी
केशोरी : चिचोली येथील जि.प. शाळेची जुनी इमारत येथील काही समाजकंठकांनी जेसीबी लावून प्रजासत्ताक दिनी पाडली. त्या इमारतीचे साहित्य आपल्या घरी घेवून गेल्याचा आरोप करुन या संदर्भात अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रारी करण्यात आल्या. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी फेब्रुवारी २०१६ ला चार दिवसाचे पं.स. अर्जुनी मोरगाव येथे आमरण उपोषण करण्यात आले. परंतु अजुनही संबंधित आरोपीवर कारवाई करण्यात आली नाही. संबंधित विभागाने त्वरित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य नारायण पाटणकर यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, चिचोली येथील जि.प. शाळेची इमारत १९६२ ला तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने आबादी जागेवर बांधली होती. ती इमारत मोळकळीस आल्यामुळे त्यामध्ये वर्ग भरणे बंद होते. परंतु सदर शाळा इमारतीची जागा माझ्या मालकीची आहे म्हणून संजय रहांगडाले, पाटील यांनी ओंकार आत्माराम कोवे, दामोदर चंमटू मडावी यांच्या मदतीने प्रजासत्ताक दिनी जेसीबी लावून जुनी शाळा इमारत पाडली. तेथील विटा, कवेलू, फाटे, दरवाजे, खिडक्या आपल्या घरी घेवून गेल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य नारायण पाटणकर यांनी केला आहे. त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना तक्रार करण्यात आली. परंतु त्यांच्याकडून तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही. यावरुन शासनातील अधिकारी किती निष्क्रीय आहेत, याची प्रचिती येत आहे.
अधिकाऱ्यांचे या प्रकरणी लक्ष वेधण्यासाठी २२ ते २५ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पं.स. अर्जुनी मोरगाव समोर आमरण उपोषण करण्यात आले. या आमरण उपोषणाचाी दखल घेत सभापती अरविंद शिवणकर, खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी चौकशी समितीचे गठण करुन संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. सदर समितीने चौकशी करुन सदर शाळा इमारत आबादी जागेवर असल्याचे स्पष्ट करुन आरोपीविरुद्ध कारवाई करण्याचे चौकशी अहवालात नोंद केली.
सदर चौकशी अहवालाच्या प्रती शिक्षण विभाग जि.प. गोंदिया आणि पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्या आहेत. परंतु त्यांच्याकडून आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई झाली नसल्याने आरोपी बेधुंद आहेत. शासकीय इमारतीची नासधूस करणे किंवा बळकावणे हा गंभीर गुन्हा आहे. या गुन्ह्याची शासन स्तरावरुन दखल घेतली गेली नाही तर जि.प. गोंदियासमोर गावकऱ्यांसह आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा ग्रा.पं. सदस्य नारायण पाटणकर चिचोली यांनी दिला आहे. (वार्ताहर)