तुमच्या चिंधीने झाकणार त्यांचा फाटका संसार
By Admin | Updated: October 25, 2016 00:45 IST2016-10-25T00:45:40+5:302016-10-25T00:45:40+5:30
दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. सुख आणि समृद्धी घेऊन येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे स्वागत

तुमच्या चिंधीने झाकणार त्यांचा फाटका संसार
‘नेकी की दिवार’ : गोरगरिबांच्या दिवाळीसाठी विश्व हिंदू परिषदेचा उपक्रम
गोंदिया : दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण. सुख आणि समृद्धी घेऊन येणाऱ्या ‘लक्ष्मी’चे स्वागत करण्यासाठी एकीकडे नवनवीन कपड्यांनी सजण्यासाठी खरेदीवर उड्या पडत आहेत. मात्र दुसरीकडे अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांना शिवण्याचीही सोय नाही. हा विरोधाभास कमी करीत अनेकांचा फाटलेला संसार झाकण्याचा एक छोटेखानी प्रयत्न गोंदियात सुरू करण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंदियाच्या नेहरू चौकात सुरू केलेल्या ‘नेकी की दिवार’ या उपक्रमात रस्त्यालगतच्या फुटपाथवर गरजवंतांसाठी जुने कपडे आणि वस्तू मोफत मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दिवाळीनिमित्त घरातील जुन्या वस्तू, जुने कपडे टाकून देण्याऐवजी ती वस्तू किंवा कपडे एखाद्या गरजवंताच्या कामी येत असेल तर किती समाधान मिळते याचा प्रत्यय सध्या गोंदियावासीय घेत आहेत.
या ठिकाणी आपल्याकडे असलेली अधिकची किंवा दुसऱ्याच्या उपयोगात येणारी टाकाऊ वस्तू ठेवता येईल आणि गरज असलेल्या व्यक्तीला तीच वस्तू घेवून जाता येईल. इमानदारीवर हा उपक्रम उभा आहे. उघड्यावर संसार असलेल्या हजारो गरीबांंना आधार ठरणाऱ्या या फुटपाथवरील भिंतीला ‘नेकी की दिवार’ असे नाव ठेवण्यात आले आहे.
मांगल्याचे प्रतिक असलेल्या दिवाळी सणाच्या पर्वावर विश्व हिंदू परिषदप्रणित बजरंग दलातर्फे या अभिनव आणि समाजाभिमुख उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमातून निराश्रीत, गरीबांच्या गरजा पूर्ण होणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आ.राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष भिकम शर्मा, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष उत्पल शर्मा, समाजसेवक उदय प्रमर, बजरंग दलाचे प्रांत संयोजक देवेश मिश्रा, विभाग संयोजक महेंद्र देशमुख, शिवसेनेचे जिल्हा राजू कुथे, उपसरपंच नीलेश देशभ्रतार, बंटी मिश्रा, पं.स.सदस्य योगराज उपराडे, संदीप कडूकर, रजनीश जायस्वाल, संजय जैन, रितेश अग्रवाल उपस्थित होते.
बजरंग दलाचे जिल्हा मंत्री मनोज मेंढे, सुधीर ब्राम्हणकर, संतोष चंदेल, मिलिंद चौरे, सुनील तिवारी, सचिन गिव्हे, संजय दुबे, अनिल हुधान, हरिश अग्रवाल, रमन उके, मुकेश उपराडे, गणेश अग्रवाल, अमित झा, भारत शुक्ला,दिनेश द्विवेदी, वीरेंद्र आंबटकर, संजय जैन, प्रतीक कदम, मुक्तानंद ढोमणे, गुड्डा द्विवेदी, टिकलू बनोटे, लक्ष्मण नाटेश्वरी, ऋषी मिश्रा, प्रदीप ठवरे, देवा रुसे, अरुण चौधरी, दिनेश मिश्रा, राजू मारवाडे यांनी या उपक्रमाला यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे.(तालुका प्रतिनिधी)
नागरिकांनी सहकार्य करावे
४प्रत्येक परिवाराकडे काही तरी अशी वस्तू असते जी त्या परिवारासाठी उपयोगाची नसते. परंतु तीच वस्तू दुसऱ्या व्यक्तीची गरज भागवते. कपडे, भांडी, चप्पल, जोडे, बालकांची खेळणी अशा अनेक वस्तू जुन्या झाल्यानंतर त्या फेकून देतात किंवा त्या भंगारमध्ये विकल्या जातात.
४अशा वस्तू न फेकता किंवा त्यांची विक्री न करता शहरातील नागरिकांनी त्या वस्तू आणून ठेवाव्या, दरम्यान या भिंतीवर लावण्यात आलेल्या वस्तू कुणाच्याही कामी पडत असतील तर अशा गरजूंनी नि:संकोच त्या वस्तू घेवून जाण्याचे आवाहन करण्यात आल्याने गरजू सायंकाळी सायंकाळी ६ पासून रात्री ९ वाजतापर्यंत या भिंतीवरील वस्तू गरजू व्यक्तींना कोणतेही शुल्क न देता घेऊन जातात.
४उपक्रम अखंडीत चालत राहावा, यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. तेव्हा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी अशा वस्तू आणून गरीबांच्या जीवनाला प्रकाशमान करण्याचे समाजकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.