प्रेमाची भुरळ घालून तरूणांची ‘ब्लॅकमेलिंग’
By Admin | Updated: August 2, 2015 01:54 IST2015-08-02T01:54:25+5:302015-08-02T01:54:25+5:30
आपण श्रीमंत तरूण असाल तर सावधान! कारण आपल्यावर कुण्या तरूणीची नजर असू शकते.

प्रेमाची भुरळ घालून तरूणांची ‘ब्लॅकमेलिंग’
श्रीमंत तरूण टार्गेट : टोळीत तरूणींचाही समावेश
नरेश रहिले गोंदिया
आपण श्रीमंत तरूण असाल तर सावधान! कारण आपल्यावर कुण्या तरूणीची नजर असू शकते. आपल्याशी जवळीक साधून आपल्याला शरीरसुख देण्याचे आमिष दाखवत जाळे टाकून नंतर पद्धतशिरपणे गंडविण्यासाठी सज्ज असू शकते. अशा तरूणींच्या जाळ्यात फसताच ती आपल्याला ब्लॅकमेल करून आपला मोठे चंदन लावून आपला खिसा रिकामा केल्याशिवाय सोडणार नाही. असाच एक प्रकार गोंदियात उघडकीस आला आहे.
बालाघाट येथील तरूण रितेश रिखीराम उपवंशी (३५) या सिमेंट व्यापाऱ्याला एका १९ वर्षाच्या तरूणीने प्रेमाची भूरळ घालून त्याला अडकविले. आपल्या मित्रांच्या मदतीने त्या व्यापाऱ्याला वारंवार ब्लॅकमेल करून त्याला २ लाख रूपयांची मागणी करण्यात आली.
बालाघाट येथे राहणारी १९ वर्षाची विशा (बदललेले नाव) ही गोंदियाच्या एका नामवंत कॉलेजात शिक्षण घेत आहे. ७ मे २०१५ रोजी तिने रितेशला फोन लावला. मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे तिने म्हटले. परंतु त्यावेळी रितेश बालाघाटच्या बँकेत कामकाज करीत होता. तो व्यस्त असल्याने त्याने फोन कापला. परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा फोन रितेशला आला. त्यावेळी तिने मी बालाघाटच्या भटेरा चौकी येथे राहते असे सांगितले. माझे वडील शिक्षक आहेत, आपली यापूर्वी भेट किरणापूरच्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचे सांगून तिने त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आपण गोंदियाच्या कॉलेजात शिकत असल्याचे सांगून २५ मे रोजी गोंदियाला जाणार असल्याचे ती म्हणाली. २५ मे रोजी रितेश स्वत:च्या घरीच खाली पडल्याने तो उपचारासाठी २६ मे रोजी गोंदियाच्या बजाज हॉस्पिटलमध्ये आला. पायाला प्लास्टर करण्यासाठी २ जून रोजी तो आपल्या चुलत भावासोबत गोंंदियाला आल्याने सायंकाळी ५ वाजतादरम्यान विशाचा रितेशला फोन आला आणि तो तिच्या जाळ्यात फसल्या गेला.
श्रीमंत तरूणांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी सुंदर तरूणींचा वापर केला जात आहे. हाताला काम नसलेल्या तरूणांना लागलेल्या वाईट व्यसनांची पुर्तता करण्यासाठी ते कोणत्या ना कोणत्या युक्त्या शोधून काढतात. श्रीमंत तरूणांना सुंदर तरूणी शरीरसुखासाठी उपलब्ध करून देऊन त्यांना गंडविण्याचा हा प्रकार सुरू झाला आहे. काहींनी बदनामीपोटी पोलिसात तक्रार केलीच नाही असाही सूर आहे.
धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न
दोन लाख रुपयांची मागणी केली असली तरी आपल्याकडे केवळ ३ हजार रूपये असल्याचे रितेशने सांगितले. आपल्या नातेवाईकांकडून पैसे मागवून घे, असे म्हणून त्या इसमांनी त्याचा मोबाईल हिसकावला. त्यांनी ३ ते ४ तास आपल्या वाहनाने रितेशला फिरविले. रितेशने हिवरा येथील राजकुमार लिल्हारे यांना फोन करून पैसे आणण्यास सांगितले. परंतु पैसे नसल्याने ते आले नाही. आम्हाला लवकर पैसे पाठव, अन्यथा तुझे फोटो नेटवर टाकू, पत्रकारांना देऊ, तुझ्या नातेवाईकांना पाठवू अशी तंबी त्या लोकांनी दिली. त्यानंतर रितेशला गाडीतून उतरवून ते निघून गेले.
४ व ५ जून रोजी दोन वेगवगळ्या मोबाईलने रितेशला फोन करून पैश्याची मागणी केली. ६ जून रोजी मध्य प्रदेशच्या रजेगाव येथील इंडियन भोजनालयात त्या घटनेचे पुरावे मिटविण्यासाठी चर्चा करायची आहे म्हणून रितेशला बोलावले. त्या ठिकाणी घटनेच्या दिवशी पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या सहापैकी चार माणसे होती. त्यातील एकाला भाईजान म्हणून सर्व हाका मारीत होते. रितेशने आपण निर्दोष असल्याचे म्हटल्यावर त्यांनी एखाद्या प्रकरणात गोवून तुला जीवनभर बाहेर येऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
आता जेवढे असतील ते १५-२० हजार देऊन टाक असे त्यांनी म्हटले. त्यावर रितेशने पैसे नसल्याचे सांगून या प्रकरणाची चर्चा मोबाईलमध्ये रेकार्र्डिंग करून ठेवली. विशाच्या माध्यमातून तुझी खोटी तक्रार करू अशी धमकी त्यांनी रितेशला दिली. पुन्हा १५ दिवसांत तुला फोन करू असे सांगून ते निघून गेले. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार रामनगर पोलिसात करण्यात आली.
असे टाकले जाते जाळे
मला तुमच्याशी भेटायचे आहे, अन्यथा मी मरून जाईल असे विशाने रितेशला म्हटले. त्यावर तू कुठे आहेस असे रितेशने विचारले असता तिने कुडवा नाक्यापुढे महावीर कॉलनी रस्त्यावर या, तिथे माझी पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मैत्रीण उभी राहील असे म्हटले. रितेश तिथे गेला असता तिच्या सांगितल्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी उभी होती. तिने रितेशला एका घरात नेले. तिथे विशा आधीच बसली होती. तिने रितेशला पकडून मला तुमच्याशी प्रेम झाले आहे असे म्हटले. त्यावर रितेशने आपण विवाहित असल्याचे सांगितले. मात्र तिने काही न ऐकता त्याच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. घरातील लाईट बंद केले. त्याचवेळी पाच ते सहा लोक तिथे आले. त्यांनी आपण पत्रकार असल्याचे सांगून रितेशचे छायाचित्र काढले. त्याला खुर्चीवर बसवून त्याचे अर्धनग्नावस्थेत फोटोही घेतले. त्यानंतर त्यांनी कार बोलावून रितेशला महावीर कॉलनीतून रामनगर येथे नेले. तुला पोलिसांपासून वाचायचे असेल तर दोन लाख रूपये दे, अशी त्याला मागणी केली.
‘त्या’ आरोपींचा जामीनच रद्द
बालाघाटच्या व्यापारी तरूणाला लुबाडण्यासाठी आलेल्या पाच तरूणांना व त्यांच्या या कामाला सहकार्य करणाऱ्या तरुणीला रामनगर पोलिसांनी अटक केली. कलम ३६४ अ, ३८५, १२० ब, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात गोकूल मनिराम मंडलवार (२४), राजा बबलू सागर (२४), विजय क्रिष्णा चौधरी (३०), विशा व तिची २३ वर्षाची बालाघाट येथील एक मैत्रीण तसेच मोहम्मद सर्फराज रजा ऊर्फ जमीलभाई अब्दुल कुरेशी (३६) रा. रामनगर बाजार चौक, गोंदिया या सहा जणांना अटक करण्यात आली. त्यांना जामीन होऊ नये यासाठी रामनगरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी न्यायालयात स्वत: बाजू मांडली.