धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:34 IST2021-09-17T04:34:42+5:302021-09-17T04:34:42+5:30
विजय मानकर सालेकसा : मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत असून, या पावसामुळे सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहून लागले आहेत. ...

धबधबा पाहायला चाललास मित्रा! पण, जरा जपून ()
विजय मानकर
सालेकसा : मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस येत असून, या पावसामुळे सर्वत्र नदी-नाले ओसंडून वाहून लागले आहेत. तसेच अनेक नदी-नाल्यांना पूरसुद्धा आला आहे. त्यावर रानावनात, दगडांतून झरे व धबधबेसुद्धा पाण्यातून कर्णमधुर संगीत निर्माण करीत आहेत. सालेकसा तालुक्याचा सुप्रसिद्ध हाजराफाॅल धबधबा लोकांना भुरळ घालत आहे. युवक-युवती हाजराफाॅल धबधब्याचा आनंद घ्यायला येऊ लागले आहेत.
गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा, वाघ नदी, गाढवी नदी, पांगोली नदी तसेच इतर सहायक नद्या व नाल्यांना पूर आला असून, पूर बघण्यासाठी लोक नदी काठावर जात असतात. काठावर जाऊन पाण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. परंतु सतत पडलेल्या पावसामुळे नदीकाठावरील जागा पानथळ झालेली असून, नदी काठावरची माती सतत कोसळत असते. अशात अगदी वाहत्या पाण्याजवळ गेल्यास पाय घसरल्याशिवाय राहत नाही; परिणामी जीव जातो. म्हणून पुराच्या पाण्यापासून पुरेशा अंतरावर राहून पाहणे हितकारक ठरेल. सालेकसा तालुक्यातील हाजराफाॅल धबधबा, देवरी तालुक्याचा ढासगड धबधबा पर्यटकांना आकर्षित करू लागला आहे. परंतु पाण्याचे आकर्षण वाढताच लोक जवळ जाऊन वेगाने पडणाऱ्या किंवा वाहणाऱ्या पाण्यासोबत खेळू लागतात, अशात तोल जाऊन धोका निर्माण होताे. देवरी सालेकसा तालुक्यातील सिरपूर, पुजारीटोला, कालीसरार धरण, तिरोडा तालुक्यातील खरबंदा, बोदलकसा जलाशय किंवा जिल्ह्यातील इतर छोटी-मोठी जलाशये तुडुंब भरलेली असून काही जलाशयांतून पाण्याचा विसर्गसुद्धा होत आहे. अशा ठिकाणी तरुण-तरुणी जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात. परंतु सेल्फीच्या नादात तोल जाऊन धोका होतो. नवेगावबांध येथील जलाशयात लोक नौकाविहार करण्याचा हेतूने येतात. परंतु पावसाळ्यात नौकाविहार करणे खूपच जास्त धोक्याचे असते. बोट उलटून लोक बुडत असल्याचा सतत घटना घडत आहेत. तरीसुद्धा लोक दक्षता बाळगताना दिसत नाहीत.
........