यादव गोळीकांडातील तिघांना जामीन
By Admin | Updated: November 6, 2016 00:51 IST2016-11-06T00:51:50+5:302016-11-06T00:51:50+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष वॉर्डात उपचाराकरिता दाखल पूर्व न.प. उपाध्यक्ष व पार्षद पंकज सुंदरलाल यादव

यादव गोळीकांडातील तिघांना जामीन
गोंदिया : जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष वॉर्डात उपचाराकरिता दाखल पूर्व न.प. उपाध्यक्ष व पार्षद पंकज सुंदरलाल यादव यांच्यावर बंदुकीने गोळी झाडून केलेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी अटक तीन आरोपींना मकोका न्यायालयातून ५०-५० हजार रुपयाच्या मुचलक्यावर जामीन मिळाला आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी संबंधित पोलीस ठाण्यात आरोपींना हजेरी लावण्याचेही आदेश यावेळी मकोका विशेष न्यायालयातील न्यायाधीश सलमान आजमी यांनी बजावले आहे.
सविस्तर असे की, १५ एप्रिल रामनवनी रोजी रात्री ८.३० वाजता सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल पंकज यादव यांच्यावर बंदुकीने गोळी झाडून हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. फिर्यादी ललीता पंकज यादव (३५) रा. यादव चौक गोंदिया यांच्या तक्रारीवरून आरोपी राजा महेश सांडेकर (२०) रा. सुभाष वॉर्ड गोंदिया, निशांत ऊर्फ अन्ना छडीमलक, सौरभ हुकुमचंद बिरीया, अभिमन्यू चतरे, अमित बिरीया, हरीकिशन चौधरी, विशाल मुरलीधर गजभिये, कुणाल महावत यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी अटक आरोपी सौरभ बीरिया, निशांत छडीमलक, अभिमन्यू चतरे, राजा सांडेकर, अमित बिरीया, हरी चौधरी, विशाल गजभिये यांना अटक करण्यात आली. यात ९ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणी आरोपी अमित रामलाल बिरीया (३४) रा. सावराटोली, हरी नंदलाल चौधरी (४०) व विशाल मुरलीधर गजभिये (३२) दोन्ही रा. मरारटोली गोंदिया यांना २५ आॅक्टोबर रोजी मकोका विशेष न्यायालयातील न्यायाधीश सलमान आजमी यांनी केलेल्या सुनावणीवरुन ५०-५० हजाराच्या मुचलक्यावर आरोपींचा जामीन मंजूर केला आहे. यावेळी सरकारकडून अॅड.आर.वी. गायकवाड, अॅड. विजय कोल्हे यांनी तर आरोपीकडून अॅड. राजे तिवारी, अॅड. पराग उके, अॅड. कारला यांनी बाजू मांडली. गुन्ह्यातील उर्वरित आरोपी अद्याप पर्यंत मोकाटच असल्याने पोलीस ठिकठिकाणी शोधत आहेत. आता गोंदियात आणखी गँग वॉर तर होणार नाही अशी भीती आहे. (तालुका प्रतिनिधी)