नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तीन वर्षांपासून थंडबस्त्यात

By Admin | Updated: December 22, 2014 22:49 IST2014-12-22T22:49:45+5:302014-12-22T22:49:45+5:30

मागील तीन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात काही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र त्यापैकी मागील वर्षी फक्त एकच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदिया

The work of the new primary health center has been in the cold storage for three years | नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तीन वर्षांपासून थंडबस्त्यात

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम तीन वर्षांपासून थंडबस्त्यात

सालेकसा : मागील तीन वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यात काही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र त्यापैकी मागील वर्षी फक्त एकच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र गोंदिया तालुक्याच्या खमारी येथे सुरु करण्यात आले. परंतु इतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अजूनही थंडबस्त्यात आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील लोकांचा अपेक्षाभंग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सालेकसा तालुक्यात गोर्रे येथेही नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले होते. मात्र आतापर्यंत ते सुरू करण्यात आले नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे यांच्या प्रयत्नामुळे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. त्यावेळी राज्यात आघाडीचे शासन होते. आघाडी शासन असेपर्यंत आरोग्य केंद्र सुरू झाले नाही. आता युतीचे सरकारने तरी हे केंद्र लवकर सुरू करावी अशी सर्वाची अपेक्षा आहे. नवीन आरोग्य केंद्र सुरू करताना पदभरती करुन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व इतर आरोग्यविषयक आरोग्य सोयी सुविधा पुरवावी लागते. त्याचप्रमाणे पुरेशी व्यवस्था असलेली सुयोग्य इमारतीची गरज असते. यासाठी शासनाला निधीची तरतूद करुन द्यावी लागते. त्याचबरोबर या सर्व बाबीसाठी राजकीय वजनाचीसुद्धा गरज पडते.
गोंदिया तालुक्याच्या खमारी येथे नवीन आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी तेथील आ. गोपालदास अग्रवाल यांनी लक्ष देत शासनाला भाग पाडले. तसेच प्रयत्न गोर्रे येथे करावे लागणार आहेत. मात्र आता नवीन आमदार भाजपचे असून शासनही भाजपचे आहे. अशात आमदारांनी प्रयत्न चालविल्यास आरोग्य केंद्र सुरू होण्यास जास्त अडचण जाणार नाही.
गोर्रे हे गाव व त्या आसपासचा परिसर आदिवासी, नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात असून या परिसरात गरीब आदिवासी व मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे. तसेच या भागात दळणवळणच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे या परिसरात कोणाची प्रकृती बिघडल्यास त्याला उपचार घेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते. सालेकसा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु चारही प्राथमिक आरोग्य केंद्र गोर्रे या गावापासून फार लांब अंतरावर आहेत. त्यामुळे तेथपर्यंत पोहचणे नेहमी त्रासदायक व विलंबाचे ठरत असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गोर्रे परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर डेंग्यू, मलेरिया, काविळ, टायफाईड यासारख्या रोगांचा सतत प्रादुर्भाव होतो. या रोगांमुळे वेळेवर औषधोपचार मिळत नसल्याने दरवर्षी रुग्ण दगावण्याचे अनेक प्रकरण घडत असतात. सर्पदंशाच्या रुग्णाला ताबडतोब औषधोपचार मिळत नसल्याने सर्पदंशाचे रुग्ण रुग्णालयात जाण्यापूर्वीच दगावतात. या सर्व बाबींचा विचार करता गोर्रे या गावी मंजूर झालेले नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करुन लोकांना आरोग्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The work of the new primary health center has been in the cold storage for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.