राका येथील महिला सक्षमीकरणाचे गबाड उघड

By Admin | Updated: June 26, 2014 23:21 IST2014-06-26T23:21:21+5:302014-06-26T23:21:21+5:30

तालुक्यातील ग्रा.पं. राका येथील महिला सक्षमीकरण समितीने महिला बचत गटाच्या नावावर रक्कम दाखवून एक लाख २० हजाराची रक्कम हडप केल्याचे पंचायत समितीच्या चौकशी अहवालानुसार

Women's empowerment in Raka is a rumor | राका येथील महिला सक्षमीकरणाचे गबाड उघड

राका येथील महिला सक्षमीकरणाचे गबाड उघड

सडक/अर्जुनी : तालुक्यातील ग्रा.पं. राका येथील महिला सक्षमीकरण समितीने महिला बचत गटाच्या नावावर रक्कम दाखवून एक लाख २० हजाराची रक्कम हडप केल्याचे पंचायत समितीच्या चौकशी अहवालानुसार सिध्द झाले आहे. समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडून सदर रक्कम वसूलीस पात्र ठरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत उघड झाली आहे.
सडक/अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत जलस्वराज्य प्रकल्प जि.प. गोंदियाव्दारे राबविण्यात आला. या प्रकल्पांतर्गत महिलांचा विकास व्हावा याकरिता महिला विकास समिती मौजा राका येथे गठित झाली. सदर समितीने आपले खाते महाराष्ट्र बँक शाखा सौंदड येथे (खाते- ५१९८) अध्यक्ष माधुरी पातोडे व सचिव प्रमिला भिवगडे यांनी महिला विकास समितीच्या नावाने उघडले. या खात्यावर जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत महिला सक्षमीकरणाचा निधी उपलब्ध झाला. सदर महिला सक्षमीकरण समितीने आपल्या गावातील रमाबाई महिला बचत गट, जागृती, माँ दुर्गा, जयलक्ष्मी, क्रांती आदिवासी, गायत्री, अहिल्याबाई होळकर, जयश्री, भारती, शारदा माता, इंदिरा, जयअंबे, नवजीवन महिला बचत गट राका अशा एकूण १३ महिला बचत गटांना महिला सक्षमीकरण समितीच्या अध्यक्षा माधुरी पातोडे यांनी एक लाख २० हजार रुपये रोखीने काढून एक लाख १९ हजार रुपयांचे वाटप बचत गटांना दाखविले व एक हजार रुपये स्वत:जवळ ठेवले. ज्या खात्यामधून रक्कम काढली ते (खाते- ०६०९०३ आहे.)
महिला बचत गटांना सक्षमीकरणांच्या नावावर खरोखरच रक्कम वितरीत करण्यात आली की नाही, महिला बचत गटांना त्यांचा फायदा झाला का, कॅश बुकला ही रक्कम घेण्यात आली की नाही, या विषयीची माहिती प्राप्त करण्यासाठी अश्विनी अशोक लांजेवार रा. राका या महिलेने माहिती अधिकार अंतर्गत पं.स. सडक अर्जुनी येथे माहिती मागितली. सदर माहिती देण्यासाठी पं.स.चे विस्तार अधिकारी यांनी ६ जून २०१३ च्या तक्रारीनुसार १६ जुलै व १३ आॅगस्ट २०१३ ला १३ महिला बचत गटांचे सविस्तर बयान नोंदवून घेतले. कोणत्या बचत गटाला किती निधी देण्यात आला, त्या निधीचे काय झाले, त्या निधीचा आणि आमचा काय संबध यावरून पं.स.चे विस्तार अधिकारी भूषण यांनी आपला अहवाल सादर केला. नऊ बचत गटांनी पैसे घेतलेच नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. एकीकडे अध्यक्ष रोखड वहिवर स्वत: स्वाक्षरी करून रक्कम वाटप केल्याचे दाखविते व बयानात रक्कम दिली नसल्याचे कबूल करीत आहे. याचा अर्थ अध्यक्षांनी रक्कम काढून कर्ज वाटपाची खोटी नोंद केल्याचे निष्कर्ष निघत आहे, असे अहवालात स्पष्ट नमुद केले आहे. पुढे असेही स्पष्ट केले आहे की, संपूर्ण बचत गटाचे रोकड वहीमधील नोंदीनुसार सर्व व्यवहार समितीचे अध्यक्ष माधुरी पातोडे यांनी केलेला असून बचत गटांना बिज भांडवलासाठी एक लाख १९ हजार व हातातील एक हजार रुपये असे एकूण एक लाख २० हजार रुपये महिला सक्षमीकरण समितीचे अध्यक्ष व सचिव यांच्याकडून वसूल पात्र ठरते. याबाबत आता पुढे काय होणार याची ग्रामस्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Women's empowerment in Raka is a rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.