आटा चक्कीच्या पट्ट्यात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू
By अंकुश गुंडावार | Updated: June 28, 2024 20:33 IST2024-06-28T20:32:55+5:302024-06-28T20:33:33+5:30
नवेगावबांध येथील घटना : दळण दळताना घडली घटना

आटा चक्कीच्या पट्ट्यात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू
नवेगावबांध (गोंदिया) : आटा चक्कीवर दळण दळताना महिलेची ओढणी चक्कीच्या पट्ट्यात अडकल्याने धडापासून डोके वेगळे होऊन मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास नवेगावबांध घडली. नीतू हर्षल उजवणे (४६, रा. नवेगावबांध असे मृतक महिलेचे नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार येथील आझाद चौकात हर्षल उजवणे यांची आटा चक्की आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांची पत्नी नीतू या नेहमीप्रमाणे आटा चक्कीवर दळण दळत होत्या. दरम्यान त्यांच्या गळ्यातील ओढणी दळण दळत असताना अचानक आटा चक्कीच्या पट्ट्यात अडकली. यामुळे त्यांचे डोके पट्ट्याखाली आल्याने आटा चक्कीच्या चाकाला अडकून ते धडापासून वेगळे झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे आटा चक्कीवर दळण दळण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी धावपळ करीत चक्की बंद केली. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात आणि गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी नवेगावबांध पोलिस स्टेशनला दिली. माहिती मिळताच ठाणेदार योगिता चाफले आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे पाठविला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
उजवणे कुटुंबीयांवर संकट
नवेगावबांध येथील हर्षल उजवणे व त्यांची पत्नी नीतू उजवणे ही दोघेही आटा चक्की चालवितात. या आटा चक्कीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. नेहमीप्रमाणे नीतू उजवणे या दळण दळत असताना अचानक ओढणी आटाचक्कीच्या पट्ट्यात अडकली. यात नीतू उजवणे यांचा मृत्यू झाला. यामुळे उजवणे कुटुंबीयावर मोठे संकट कोसळले.