शाळा-महाविद्यालयात गाजणार का तंटामुक्त मोहीम?
By Admin | Updated: June 25, 2014 23:52 IST2014-06-25T23:52:04+5:302014-06-25T23:52:04+5:30
महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते.

शाळा-महाविद्यालयात गाजणार का तंटामुक्त मोहीम?
गोंदिया : महाराष्ट्र शासनाने ३० नोव्हेंबर २०१० रोजी एक शासन निर्णय काढून शाळा महाविद्यालयात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेवर आधारित वादविवाद, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविण्यात आले होते. या निर्णयाला चार वर्षाचा कालावधी लोटत असतानाही जिल्ह्यात एकाही महाविद्यालयात किंवा शाळेत तंटामुक्त वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही.
तंटामुक्त मोहिमेची प्रखरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने शाळा महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावे, असे शासनाने नमूद केले होते. या मोहिमेत व्यापक लोक सहभाग नोंदविण्यासाठी अभिनव संकल्पना निर्माण करून ही मोहीम लोक चळवळ होण्यासाठी जिल्हास्तरावर नेतृत्व प्रदान करायचे होते. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महविद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विकासात्मक प्रशासनाच्या माध्यमातून राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे. त्याबद्दल त्यांचे आकलन वाढविणे हा उद्देश शासनाचा होता. विद्यार्थ्याना समकालीन समस्याचे यथार्थ ज्ञान व्हावे, ज्ञानाच्या कक्षा रुंदावून आणि सामाजिक अधिक प्रगल्भ व्हाव्यात आणि त्यांचे क्षितीज विस्तारावे यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यातआले होते. मोहिमेत तरूणाचा सहभाग वाढावा, भविष्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात निर्माण होणारे नेतृत्व सजग व क्रियाशील व्हावे, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित शिक्षणात गुंतवून न ठेवता त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांचे विद्यार्थ्याना साक्षेपी आकलन व्हावे, या उद्देशातून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेबाबत प्रत्येक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात वादविवाद, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले होते.
परंतु जिल्ह्यातील एकही शाळेत तंटामुक्त मोहिमेवर आधारित निबंध, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही. तरूणांचा मोहिमेत सहभाग वाढावा याबाबीला जिल्ह्यात तिलांजली देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने शांततेतून समृध्दीकडे जाण्यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू केली. या मोहीमेचा मर्म विद्यार्थ्याना माहित व्हावा यासाठी शासनाने ही मोहीम विविध स्पर्धेच्या माध्यामातून शाळा महाविद्यालयात रूजविण्यास सांगितले.
(तालुका प्रतिनिधी)