आंदोलन मागे घेणार नाही
By Admin | Updated: July 15, 2014 00:02 IST2014-07-15T00:02:15+5:302014-07-15T00:02:15+5:30
गेल्या २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना अखेर सोमवारी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. या नोटीसमध्ये त्यांना त्वरीत कामावर रूजू होण्यास सांगण्यात आले आहे.

आंदोलन मागे घेणार नाही
राज्य संघटनेचा निर्णय : ग्रामसेवकांचे आजपासून मुंबई उपोषण
गोंदिया : गेल्या २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना अखेर सोमवारी कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाली. या नोटीसमध्ये त्यांना त्वरीत कामावर रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. मात्र ग्रामसेवकांच्या राज्य संघटनेने आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर १५ जुलैपासून मुंबईतील आजाद मैदान येथे ग्रामसेवक उपोषणावर बसणार आहेत. यामुळे ग्रामसेवकांचे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
वेतन त्रुटी, स्वतंत्र यंत्रणा, भत्ते यासह अन्य मागण्यांसाठी ग्रामसेवकांनी २ जुलैपासून कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्यस्तरावर सुरू असलेल्या या आंदोलनांतर्गत ग्रामसेवकांनी त्यांच्याकडील चाब्या व शिक्के पंचायत समितीत जमा केले. सुमारे ३४० ग्रामसेवक आंदोलनात सहभागी असून यामुळे जिल्ह्यातील सुमारे ५०१ ग्राम पंचायतींचा कारभार विस्कटला आहे.
अशात मात्र विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची विविध प्रमाणपत्रांसाठी फसगत होत आहे. तर यावर पर्यायी व्यवस्था करण्यात पंचायत विभाग अपयशी ठरल्याने नागरिकांत रोष निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेत, ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ व जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती खंडविकास अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलनात सहभागी ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस धाडले होते. सोमवारी (दि.१४) या ग्रामसेवकांना नोटीस प्राप्त झाले.
नोटीसमध्ये, ग्रामसेवकांना त्वरीत कामावर रूजू होण्याचे सांगण्यात आले आहे. अन्यथा मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १५३ (ए) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत राज अधिनियमाचे कलम २६१ नुसार शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून कमी करण्याचे कळविण्यात आले आहे.
असे असतानाही मात्र ग्रामसेवक आपले आंदोलन मागे घेणार नाही असा निर्णय ग्रामसेवकांच्या राज्य संघटनेने घेतला असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तीक चव्हाण यांनी सांगीतले. तर आपल्या मागण्यांसाठी आता १५ जुलै पासून मुंबईतील आजाद मैदान येथे ग्रामसेवक आमरण उपोषण करणार आहेत.
यात संघटनांचे जिल्हाध्यक्ष व सचिव सहभागी होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगीतले. विभागाने ग्रामसेवकांना नोटीस देऊन आंदोलन मागे घेण्याचा दबाव निर्माण केला. मात्र यावरही ग्रामसेवक उचललेले पाऊल मागे घेण्यास तयार नसल्याने आता हे आंदोलन अधिकच चिघळणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. (शहर प्रतिनिधी)