भूमीपुत्र खासदार शेतकऱ्यांच्या मदतीला धावतील काय?
By Admin | Updated: July 31, 2014 00:06 IST2014-07-31T00:06:45+5:302014-07-31T00:06:45+5:30
तलावाचा जिल्हा पावसाअभावी दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांबरोबर हजारो तलाव पाण्याने भरले आहेत. पण इंद्रदेवाने सध्या पाठ फिरविलेली आहे.

भूमीपुत्र खासदार शेतकऱ्यांच्या मदतीला धावतील काय?
पांढरी : तलावाचा जिल्हा पावसाअभावी दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख जलाशयांबरोबर हजारो तलाव पाण्याने भरले आहेत. पण इंद्रदेवाने सध्या पाठ फिरविलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अर्धी पेरणी आटोपली असून उर्वरीत पेरणी पाण्यामुळे अपुरी आहे. या परिसरामध्ये चुलबंद जलाशय ८० ते ९० टक्के भरले आहे. परंतु त्याचे पाणी अजूनपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. त्यासाठी येथील शेतकरी वारंवार अर्ज करीत आहेत.
मागील वर्षी या कालावधीमध्ये रोवण्या सुरू झाला होता. परंतु यावर्षी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे. तलावाचा जिल्हा म्हणून जिल्ह्याची सर्वत्र ओळख आहे. सिंचनाची भक्कम सोय या जिल्ह्यात असल्याचा उदोउदो लोकप्रतिनिधी करतात. प्रत्यक्षात मात्र शेताऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहे. जिल्ह्यात शेकडो तलाव व जलाशय असली तरी आजही हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचीत आहे. जिल्ह्यात इटियाडोह, शिरपूर, पुजारीटोला, कालीसरार, चुलबंद इत्यादी सरोवरातून सिंचनाची सोय केली जाते. पावसाळयात नव्हे तर या प्रकल्पांच्या भरवश्यावर उन्हाळ्यात देखील शेतकरी धान उत्पादन घेतात. परंतु यावर्षी पावसाने दोन ते तिन दिवस भरघोष पाऊस देऊन दांडी मारली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी धानाची पेंडी विधानभवनात नेवून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या नाना पटोले यांनी स्वत:ची ओळख भूमिपूत्र म्हणून गोंदिया, भंडारा जिल्ह्यात निर्माण केली आहे. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठमोठे आंदोलन उभारून विरोधकांना हादरून सोडणारे भूमिपुत्र पटोले आज घडीला सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. परिणामी शेतकऱ्याचे कैवारी नेते मदतीला धावतील काय? अशी आर्त हाक शेतकरी देऊ लागले आहेत. (वार्ताहर)