पत्नीचे अनैतिक संबंध पतीच्या जीवावर बेतले

By Admin | Updated: May 12, 2014 23:49 IST2014-05-12T23:49:40+5:302014-05-12T23:49:40+5:30

पतीने आपल्या पत्नीला परपुरूषाशी आपत्तीजनक स्थितीत पाहिल्यावर त्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराशी वाद झाला. यात पत्नीच्या मदतीने प्रियकराने त्याचा काटा काढला.

Wife's immoral relationship betrays husband | पत्नीचे अनैतिक संबंध पतीच्या जीवावर बेतले

पत्नीचे अनैतिक संबंध पतीच्या जीवावर बेतले

गोंदिया : पतीने आपल्या पत्नीला परपुरूषाशी आपत्तीजनक स्थितीत पाहिल्यावर त्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराशी वाद झाला. यात पत्नीच्या मदतीने प्रियकराने त्याचा काटा काढला. या घटनेला अपघात दाखविण्याचा दोघांनी चंग बांधला मात्र डुग्गीपार पोलिसांनी सदर घटना दोन दिवसात उघडकीस आणली. परिणामी पत्नी व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली.

अर्जुनी/मोरगाव तालुक्याच्या कवठा (बोळदे) येथील कैलाश दशरथ पुस्तोडे (३६) हा विमा प्रतिनिधी होता. तो बुधवारी सकाळी विमा काढण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा येथे गेला होता. दोन दिवस येणार नाही असे त्याने आपल्या पत्नीला सांगून ठेवले होते. परंतु बुधवारच्या मध्यरात्री तो घरी परतला. यावेळी कैलाशची पत्नी सुषमा (२७) ही सचिन शेषराज फुंडे (२४) या तरूणासोबत आपत्तीजनक स्थितीत त्याच्याच घरी आढळली. हे चित्र पाहून कैलाशचा राग अनावर झाला. यात त्याने शिविगाळ करून मारहाण करणे सुरु केले. यावेळी आरोपी सचिन फुंडे याने धारदार शस्त्राने कैलाशच्या डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कैलाशचा काही क्षणातच मृत्यू झाला.

आरोपी सचिन हा बकी मेंडकी येथील आहे. त्याचे मोबाईल दुकान सडक/अर्जुनी येथे आहे. कैलाश घरी नसल्यावर सुषमा सचिनला नेहमीच आपल्या घरी बोलावित असे, असे पोलीस सुत्रांनी सांगीतले. कैलाशपासून सुषमाला दोन मुले आहेत. मोठा मुलगा सुषमाच्या माहेरी गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथे आजीकडे राहायला होता. सुषमा आपल्या दोन वर्षाच्या मुलासोबत त्या दिवशी घरी होती. मुलगा झोपला असताना तिने आपल्या प्रियकराला बोलावून घेतले. कैलाश येणार नसल्याचे पाहून तिने प्रियकराला बोलाविले. मात्र कैलाश रात्री आल्यावर या प्रकरणाचे बिंग फुटले. या घटनेत कैलाशला ठार केल्यानंतर हे प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये यासाठी आरोपी सचिनने अंगणात असलेल्या कैलाशच्या मोटारसायकल एम.एच.३५ डब्ल्यू. २५९६ वर कैलाशचा मृतदेह ठेवून घरापासून साडे तीन कि.मी. अंतरावर असलेल्या शेंडा रस्त्यावर बाणटोला शिवारात नेऊन टाकला.

रस्ता अपघात दाखविल्यास प्रकरण अंगावर येणार नाही असे त्यांना वाटत होते. परंतु या संदर्भात उत्तरीय तपासणी करणार्‍या डॉक्टरांनी कैलाशच्या डोक्यावर असलेल्या जखमा अपघाताच्या नाही असा अहवाल दिला. त्यानंतर घटनेतील वाहनाला एकाही ठिकाणी खरचटलेले नाही. कैलाशच्या फक्त डोक्यावर जखम मात्र शरिरावर जखमा नाही ही परिस्थिती पाहता डुग्गीपार पोलिसांनी सदर घटने संदर्भात भादंविच्या कलम ३0२, २0१ अन्वये गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास करताना अवघ्या दोन दिवसांत डुग्गीपार पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलीस अधीक्षक दिलीप झळके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपास करून आरोपी सचिन शेषराज फुंडे (२४) व सुषमा कैलास पुस्तोडे (२७) या दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wife's immoral relationship betrays husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.