कुठे बनणार प्रथम श्रेणी पशु चिकित्सालय?
By Admin | Updated: December 21, 2014 23:02 IST2014-12-21T23:02:33+5:302014-12-21T23:02:33+5:30
जिल्हा पशू संवर्धन विभाग व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या गैरसमजुतीमुळे दासगाव येथे बांधकाम करण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी पशु चिकित्सालयाचे बांधकाम अपूर्ण पडून आहे.

कुठे बनणार प्रथम श्रेणी पशु चिकित्सालय?
गोंदिया : जिल्हा पशू संवर्धन विभाग व बांधकाम विभागातील अधिकारी यांच्या गैरसमजुतीमुळे दासगाव येथे बांधकाम करण्यात येणाऱ्या प्रथम श्रेणी पशु चिकित्सालयाचे बांधकाम अपूर्ण पडून आहे. हे त्या अधिकाऱ्यांच्या गैरसमजुतीमुळे झाले की जेथे काम करणे गरजेचे होते, तेथे न करता दुसऱ्याच ठिकाणी काम सुरू करण्यात आले. आता त्याच्या परिणामाकडे दुर्लक्ष करून हे अधिकारी आपली चूक एक-दुसऱ्यावर थोपवित आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या पशू संवर्धन विभागाच्या वतीने दासगाव येथे प्रथम श्रेणीचे पशू चिकित्सालय मंजूर करण्यात आले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दासगाव खुर्द पंचायतच्या अधिकाऱ्यांना फोन करून मंजूर पशू चिकित्सालयासाठी प्रस्ताव पारित करण्याची सूचना दिली. एवढेच नव्हे तर त्यांना पशू चिकित्सालयासाठी जागेचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देशही दिले. त्या निर्देशाच्या आधारावर दासगाव खुर्द पंचायतने २० मे २०१३ रोजी सभेत प्रस्ताव पारित करून पशू चिकित्सालयाच्या बांधकामास मंजुरी दिली.
यानंतर २७ मे २०१३ रोजी दासगाव खुर्द येथील गट-८८६ च्या जागेचा नकाशा व सात-बारा जि.प. च्या पशू संवर्धन विभागास पाठविण्यात आला. यानंतर दासगाव पंचायतकडून बांधकामाबाबत ना हरकत प्रमाणपत्र मागण्यात आले. १३ आॅगस्ट २०१४ रोजी दासगाव पंचायतीने ना हरकत प्रमाणपत्रही दिले. जि.प. च्या बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता शुक्ला यांनी प्रस्तावित स्थळी जावून निरीक्षण केले व त्या ठिकाणी जागेचे खोदकाम सुरू करण्यात आले.
काही दिवसांनंतर अचानक काम थांबविण्यात आले. दासगाव खुर्दच्या ग्रामस्थांना काही दिवसानंतर माहिती मिळाली की, त्यांच्या गावचे काम थांबवून दासगाव बु. येथे सुरू करण्यात आले आहे. सदर माहिती मिळताच ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले व मंजूर केलेल्या ठिकाणीच काम सुरू करण्याची मागणी केली.
दासगाव खुर्दचे उपसरपंच सतीश कोल्हे, सदस्य सुकलाल बोपचे, अमृतलाल रहांगडाले व माजी ग्रा.पं. सदस्य अनिल बावणकर यांनी सांगितले की, त्यांच्या गावात मंजूर करण्यात आलेल्या प्रथम श्रेणी पशू चिकित्सालयाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे. असे न केल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारासुद्धा दिला आहे. ग्रामस्थांनी म्हटले आहे की, जि.प. सदस्य रूद्रसेन खांडेकर यांनीसुद्धा दासगाव खुर्दच्या दाव्याला योग्य सांगितले आहे. एकाच कामाचे दोन ले-आऊट कसे घेण्यात आले? दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अंतर्गत भूमिपूजन करून खोदकाम सुरु करण्यात आले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे पशू संवर्धन अधिकारी एम.एस. चव्हाण यांच्याशी चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले की, दासगाव बु येथे २५ वर्षांपासून पशू रूग्णालय सुरू आहे. प्रथम श्रेणी पशू संवर्धन रूग्णालयाच्या बांधकामास मंजुरी दासगावात मिळाली आहे. तेथे कोणतेही खुर्द किंवा बु. नमूद नाही. त्यामुळेच दासगाव खुर्द पंचायतकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले. परंतु जेव्हा दासगाव बु. चे नागरिक अधिकारी-पदाधिकाऱ्यांकडे गेले, तेव्हा चूक समजून आली व दासगाव खुर्दचे काम थांबवून दासगाव बु. येथे काम सुरू करण्यात आले. तसेच २५ वर्षांपासून दासगाव बु. येथे पशू चिकित्सालय आहे. आता श्रेणी वाढविण्यात आली, तर पहिला अधिकार दासगाव बु.चाच आहे, असेही जिल्हा पशू संवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
या वादामुळे दोन्ही गावांतील नागरिक एकमेकाविरूद्ध उभे झाले आहेत. आता त्यांच्या वाद कुठपर्यंत पोहचतो व अधिकारी या वादविवादाला कसे सोडवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. परंतु केवळ एका अधिकाऱ्याच्या गैरसमजुतीमुळे दोन्ही गावांत शत्रुतेची रेषा ओढली गेली, हेही तेवढेच सत्य. (प्रतिनिधी)