स्कूल बसेसचे स्पीड गव्हर्नर गेले कुठे?
By Admin | Updated: May 13, 2014 23:41 IST2014-05-13T23:41:29+5:302014-05-13T23:41:29+5:30
स्कूल बसेसचे वाढते अपघात लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्याकरिता परिवहन विभागाने स्कूल बसेसला वेगर्मयादा व डोअर सायरन लावणे अनिवार्य केले आहे.

स्कूल बसेसचे स्पीड गव्हर्नर गेले कुठे?
गोंदिया : स्कूल बसेसचे वाढते अपघात लक्षात घेऊन त्यावर आळा घालण्याकरिता परिवहन विभागाने स्कूल बसेसला वेगर्मयादा व डोअर सायरन लावणे अनिवार्य केले आहे. यासंबधीचे आदेश परिवहन उपायुक्तांनी निर्देश ५ एप्रिल २0११ रोजी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहे. स्कूल बसकरिता उपप्रादेशिक परिवहन विभागाने काही नियम लागू केले होते. मात्र या नियमांचे पालनच केले जात नव्हते. त्यामुळे स्कूल बसेसच्या अपघातांची संख्या बरीच वाढली होती. या घटनांमध्ये राज्यातील शेकडो निष्पाप विद्यार्थ्यांंंचा बळी गेला. मात्र तरीही याबाबत ज्या विभागांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी होती ते विभागच गप्प बसले असल्याने स्कूल बसेसच्या अपघातांची संख्या बरीच वाढली होती. यावर सर्व स्तरातून ओरड झाल्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने स्कूल बसेसकरिता नियमावली तयारी केली. तसेच सर्व स्कूल बस संचालकांना नोटीस देऊन त्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश ५ एप्रिल २0११ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार दिले होते. या नियमांमध्ये परिवहन आयुक्तांनी यावर्षी पुन्हा सुधारणा केली आहे. यासंबंधीचे आदेश परिवहन उपआयुक्तांनी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. यात स्कूल बससाठी वेगर्मयादा ६0 कि.मी. प्रतितास निर्धारित करण्यात आली असून याकरिता ‘स्पीड गव्हर्नर’ हे यंत्र लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विद्यार्थी स्कूल बसमध्ये चढताना व उतरताना अपघात किंवा विद्यार्थ्यांंंना कुठलीही हानी पोहोचू नये याकरिता बसच्या दरवाज्याला सायरन व डाव्या बाजूला चालकाच्या लक्षात येईल या दृष्टीने मोठा आरसा लावण्याची सूचनाही देण्यात आल्या होत्या. यामुळे चालकाला विद्यार्थी बसमध्ये चढत व उतरत असल्याचे दिसेल. याच बरोबर प्रत्येक स्कूल बसमध्ये प्रथमोपचार पेटी, अग्निशमन यंत्र असणे अनिवार्य करण्यात आले होते. शाळेतील मुलांची सुरक्षितपणे ने-आण करणे, परिवहन शुल्क, बस थांबे निश्चित करणे या बाबीकडे लक्ष देण्याकरिता प्रत्येक शाळेत एक परिवहन समिती नियुक्त करण्यात यावी. तसेच ही समिती नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, परवाना, वायू प्रदुषण नियंत्रण प्रमाणत्र, वाहन चालविण्याचा परवाना आदी कागदपत्रांची तपासणी करेल. या समितीच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक असेल व एक पालक शिक्षक संघाचा प्रतिनिधी, वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक, स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. यासह अन्य नियमदेखील लागू केले होते. विशेष म्हणजे स्कूल बसेसमध्ये स्पीड गर्व्हनर व डोअर सायरन आणि मोठा आरसा लावण्याकरिता मुदत देण्यात आली होती. परंतु वर्ष लोटूनही स्पीड गव्हर्नर लावण्यात आले नाही. (तालुका प्रतिनिधी)