अतिवृष्टी सहायता निधी गेला कुठे?
By Admin | Updated: July 29, 2014 23:54 IST2014-07-29T23:54:00+5:302014-07-29T23:54:00+5:30
सडक/अर्जुनी तालुक्यासाठी शासनाने पाठविलेला अतिवृष्टी सहायता निधी गेला कुढे? असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकरी करीत आहेत. महिने लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही.

अतिवृष्टी सहायता निधी गेला कुठे?
शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यासाठी शासनाने पाठविलेला अतिवृष्टी सहायता निधी गेला कुढे? असा प्रश्न तालुक्यातील अनेक शेतकरी करीत आहेत. महिने लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम जमा झाली नाही. याची विचारपूस करण्याकरिता तहसील कार्यालयाच्या संबंधीत बाबूकडे गेले असता मी नव्यानेच चार्ज घेतला आहे. गठ्यात असेल असे टालमटोल उत्तरे शेतकऱ्यांना देण्यात येतात. यावरून देवरीची पुनरावृत्ती तर झाली नसावी अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागली आहे.
मागील वर्षीच्या अतिवृष्टीने शेतकरी होरपळून निघाला. जखमेवर ईलाज म्हणून शासनाने नुकसान भरपाईची रक्कम जिल्ह्याच्या आठही तालुक्याला वळती केली. तलाठ्याकरवी प्रत्येक शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. तलाठ्यांनी इमाने इतबारे खाते क्रमांक व आराजीची यादी तहसील कार्यालयास सादर केली. परंतु अनेक कास्तकारांची नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यात आजपावेतो जमाच झाली नाही.
सदर प्रतिनिधीने वरिल घटनेची माहिती घेण्याकरिता संबंधीत लिपीकाशी संपर्क साधला असता. शेतकऱ्यांनी खाते क्रमांक व बँकेचे नावबरोबर दिले नाही. सध्या गठ्ठा मोठा आहे. बँकेकडून लिस्ट आली आहे. जेवढे शेतकरी सहायता निधीपासून सुटले आहेत ते बघावे लागणार असे उत्तर देऊन मोकळे झाले.
आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम मिळेल व त्या रकमेचा उपयोग पावसाळी हंगामाला होईल या आशेने शेतकरी तयारीत असतानाच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे त्याचे बेहाल होत आहेत. तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाईची रक्कम त्यांचा बँक खात्यात वळती करावी अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)