तनं जुळली, मनं जुळतील काय?
By Admin | Updated: July 17, 2015 01:08 IST2015-07-17T01:08:51+5:302015-07-17T01:08:51+5:30
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते असे म्हटले जाते. पण आता प्रेम आणि युद्धासोबत त्यात ‘राजकारण’ हा शब्द नव्याने जोडावा लागणार की काय, ...

तनं जुळली, मनं जुळतील काय?
सत्तेसाठी तत्त्वं गहाण : पक्षादेशाच्या अवहेलनेची काँग्रेस श्रेष्ठींनी घेतली गंभीर दखल
मनोज ताजने गोंदिया
प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते असे म्हटले जाते. पण आता प्रेम आणि युद्धासोबत त्यात ‘राजकारण’ हा शब्द नव्याने जोडावा लागणार की काय, अशी परिस्थिती सध्या गोंदिया जिल्ह्यात निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपा हे दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष एकत्र आले. आपल्याच उमेदवारांना निवडून देण्याची मागणी करीत ज्यांनी कालपर्यंत दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराविरूद्ध गरळ ओकली त्याच उमेदवारांच्या हातात हात घालून आता दोन्ही पक्षांचे सदस्य जिल्हा परिषदेची सत्ता उपभोगणार आहेत.
काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची ध्येयधोरणे वेगळी, आदर्श वेगवेगळे, परंपरा वेगळी, कुठल्याही अँगलने त्यांनी एकत्रित यावे असे साम्य दोन्ही पक्षात नाही. तरीही केवळ सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी केलेला घरोबा आणि आपापल्या तत्वांशी केलेली तडजोड मतदारांनाच नाही तर कोणत्याही सूज्ञ माणसाला न पटणारी अशीच आहे. जिल्हा परिषदेत एकत्रितपणे काम करताना याचा अनुभव या पदाधिकाऱ्यांनाही काही दिवसातच येणार आहे. आपल्याला सत्ता मिळाल्याचे क्षणिक समाधान जरी या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या नेत्यांना लाभणार असले तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेचा उपयोग ठोसपणे काहीतरी भरीव कामे करून लोकांवर छाप पाडण्यासाठी होईल का? याबाबत आजतरी शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पाच वर्षात एकमेकांना धारेवर धरणारे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य आता ‘मित्र’ म्हणून हातमिळवणी करतानाही मनातून कचरत आहेत. त्यामुळे योग्य समन्वयातून चांगले काम करण्यासाठी तनं जुळली तरी मनं जुळतील का? याबाबतची शंका निर्माण झाली आहे.
लोकांनी विश्वासाने निवडून दिल्यानंतर कोणी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप कामावर पाडून आपल्या हातून विधायक कार्य होईल अशी इच्छा ठेवून असते, तर कोणी सत्तेला कमाईचे साधन बनवून मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल, यासाठी हपापलेले असते. जिल्हा परिषदेत विराजमान झालेल्या दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी, सदस्यांमध्ये दोन्ही मानसिकतेचे लोक असू शकतात. अशावेळी कोणाला एकाला दुसऱ्याशी जुळवून घेताना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. येणारी ५ वर्षे कसातरी सत्तेचा गाडा हाकलल्यानंतर ५ वर्षांनी पुन्हा जनतेसमोर जाताना काँग्रेस आणि भाजपचे सदस्य व त्यांचे नेते पुन्हा एकमेकांंवर कोणत्या तोंडाने आरोप करतील, आणि करतील तरी त्या ‘नौटंकी’तून मतदार उल्लू बनतील का? आतापर्यंत कमावलेली मतदारांची विश्वासार्हता त्यावेळी पुन्हा राहील का? या प्रश्नांची उत्तरे त्यांना त्रासदायक ठरणार आहेत.
निष्ठावंत काँग्रेसी चिडीचूप!
जिल्हा परिषदेवर सत्तेचे जुगाड करताना भाजपपेक्षाही काँग्रेसने आपली पत गमावलेली आहे. कारण भाजपजवळ समविचारी पक्षाचा पर्याय नव्हता. मात्र काँग्रेसकडे अनेक वर्षे सोबत असणाऱ्या राष्ट्रवादीचा पर्याय असताना आणि समविचारी पक्ष म्हणून प्रदेश काँग्रेसकडूनही सदस्यांना जारी केलेल्या पक्षादेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्यास सांगितले असताना तो आदेश पाळण्यात आला नाही. यामुळे काँग्रेसमध्ये आता कोणीच खरे निष्ठावंत राहिले नाही का? असाही सूर ग्रामीण भागात उमटत आहे. जुन्या काँग्रेसी नेत्यांपैकी माजी जि.प.अध्यक्ष के.आर. शेंडे, टोलसिंग पवार, माजी मंत्री भरत बहेकार, माजी आमदार रामरतन राऊत, मीताराम देशमुख आदींना मानणारे अनेक जि.प.सदस्य निवडून आले आहेत. पण या नेत्यांनीही आपल्या प्रभावक्षेत्रातील या घडामोडींसाठी कोणताही विरोध न दर्शविता भाजपशी घरोबा करण्यासाठी मूक संमती दिल्याने एकेकाळी निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसी नेत्यांबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घटनाक्रमाची माहिती दिल्लीपर्यंत
गोंदियातील या घडामोडींची काँग्रेस श्रेष्ठींनी दखल घेतली असून याबाबतची चर्चा मुंबईच नाही तर दिल्लीपर्यंत पोहोचली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईत यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांनी चर्चा केली. या प्रकारामुळे दोन्ही पक्षातील समन्वय धोक्यात येण्याची शक्यता वर्तवून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधींनाही याबाबतची माहिती देण्यात आल्याचे समजते. पक्षाचा व्हीप स्वीकारण्यास नकार देऊन वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याबद्दल त्या सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर तसे झाले तर काँग्रेसच्या सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
सदस्यांना विश्वासात न घेताच पक्षाने काढला व्हीप
काँग्रेस पक्षाचे सदस्यसंख्या कमी असली तरी आम्हाला अध्यक्षपद मिळावे ही सदस्यांची भावना होती. राष्ट्रवादी काँग्रेसला ते मान्य नव्हते. असे असताना आम्ही त्यांना साथ का द्यावी? असा सवाल गुरूवारी काँग्रेसचे नेते आ.गोपालदास अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. आमची बोलणी पूर्ण होण्याआधीच आमच्या पक्षश्रेष्ठींनी आमच्या सदस्यांना विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सहकार्य करण्याचा पक्षादेश काढला. त्यामुळे सदस्यांनी तो स्वीकारला नाही. निवडणुकीपूर्वीही आमच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप सारखेच होते. आमच्यासाठी कोणीही मित्रपक्ष नव्हता, असे आ.अग्रवाल म्हणाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, सरचिटणीस अपूर्व अग्रवाल उपस्थित होते.
सभापती निवडणुकीसाठी पुन्हा निघणार व्हीप
येत्या २७ जुलैला होणाऱ्या जिल्हा परिषद सभापतिपदाच्या निवडणुकीत हा प्रकार होऊ नये म्हणून पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या वतीने व्हीप काढला जाणार आहे. विशेष म्हणजे हा व्हीप प्रत्येक सदस्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था काँग्रेसच्या वरिष्ठांकडूनच केली जाणार असून त्याची तयारी मुंबईत सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांपुढे पक्षादेश मानायचा की कारवाईला सामोरे जायचे, असे दोन पर्याय उभे राहू शकतात.