काय सांगता, ५ मेपर्यंत पावसाचा ‘फोरकास्ट’? तापमान ३५.२ अंशांवर
By कपिल केकत | Updated: April 29, 2023 17:51 IST2023-04-29T17:51:16+5:302023-04-29T17:51:46+5:30
Gondia News हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देत एक-एक दिवस वाढविला जात असतानाच आता येत्या ५ मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय सांगता, ५ मेपर्यंत पावसाचा ‘फोरकास्ट’? तापमान ३५.२ अंशांवर
गोंदिया : हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देत एक-एक दिवस वाढविला जात असतानाच आता येत्या ५ मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच मागील दोन दिवसांपासून रात्री पाऊस हजेरी लावत असल्याने वातावरणात गारवा असून तापमान ३५.२ अंशांवर आले आहे.
अवघ्या एप्रिल महिन्यात मोजकेच दिवस उन्हाळ्यात पाहिजे तसे ऊन तापले व त्यातच तापमान ४३ अंशांवर गेले होते; मात्र बहुतांश दिवस पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पाहिजे तसे ऊन तापले नाही. त्यात आता मागील दोन दिवसांपासून रात्री पाऊस बरसत आहे. परिणामी तापमान ३५.२ अंशांवर आले आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने आता येत्या ५ मेपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. तर २ मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. यावरून एप्रिल महिना तर गेलाच आता मे महिन्यातही पावसाचे बस्तान राहणार आहे काय, असा प्रश्न पडत आहे.
आरोग्यावर परिणाम, तर शेतकरी चिंतित
- अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वातावरण सतत बदलत असून दिवसा ऊन, तर रात्री पाऊस अशी स्थिती झाली आहे. याचा परिणाम आरोग्यावर जाणवत असून सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढत आहेत. याशिवाय, अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी होत असल्यामुळे शेतकरी चिंतित पडला आहे. हाती येणाऱ्या पिकांवर पावसामुळे रोगराई वाढत असल्याने शेतकरी डोक्यावर हात ठेवून बसला आहे.