बजेटमध्ये बेराेजगारांसाठी काय रे भाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:43+5:302021-02-05T07:47:43+5:30
गोंदिया : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या संकटानंतर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने याकडे ...

बजेटमध्ये बेराेजगारांसाठी काय रे भाऊ
गोंदिया : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी अर्थसंकल्प सादर केला. कोरोनाच्या संकटानंतर हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने याकडे सर्वसामान्यांचे सर्वाधिक लक्ष लागले होते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला, छोटे-मोठे व्यवसाय डबघाईस आले. त्यामुळे अनेकांना रोजगार शोधण्याची वेळ आली. मागील वर्षभरापासून कुठलीच नोकर भरती नसल्याने हजारो बेरोजगार युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांना या अर्थसंकल्पाकडून रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा होती. मात्र, तशी कुठलीच तरतूद नसल्याने बेरोजगारांची निराशा झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार असल्याने महागाईत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा फटका पुन्हा सर्वसामान्य नागरिकांनाच बसणार आहे. तर महिला सुरक्षेच्या दृष्टीने अर्थसंकल्पात कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी बजेटवर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, बेरोजगारांसाठी काय रे भाऊ, असा सवाल केला आहे.
.......
केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ एक कोटी गरीब कुटुंबांना होईल; परंतु गृहिणींच्या हितासाठी किंवा समाजातील घटकांचा विकास होईल असे काहीच या अर्थसंकल्पात मांडण्यात आले नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाने गृहिणींची निराशा झाली आहे. - माया शिवणकर, गृहिणी, आमगाव.
....
आत्मनिर्भर भारतच्या नावावर लोकांना भ्रमित केले जात आहे. कोरोनाच्या संकटाने महागाई वाढली. महागाई सतत वाढतच असताना सर्वसामान्यांना या बजेटचा काहीच फायदा होणार नाही.
- रवींद्र गायधने, दागोटोला
....
सरकारने खासगी नोकरांसाठी या अर्थसंकल्पात विशेष असे काहीच केले नाही. कोरोनामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला; परंतु त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यापेक्षा सरकार अनेक सरकारी यंत्रणा खासगी करीत आहे. खासगी नोकरदारांसाठी बजेट नव्हता.
-हरिष भुते, खासगी नोकरदार
...
शेतासाठी लागणारे खते, बियाणे व शेती उपयोगी अवजारांची किंमत वाढल्याने शेतकऱ्यांना रडविणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी कामे केंद्र शासन करीत असून, शेतकऱ्यांच्या फायद्याचे गोडवे गाणाऱ्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे बजेटमध्ये दुर्लक्ष केले आहे.
-भरतलाल हुकरे, शेतकरी.
....
ज्येष्ठ नागरिकांना आयकर भरण्याची गरज नाही, हे अर्थसंकल्पात चांगले करण्यात आले; परंतु ७५ वर्षे ओलांडणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्नच नाहीच्या बरोबरीत असते. यामुळे या अर्थसंकल्पाचे आकर्षण पाहिजे तेवढे नाही. केवळ आवळा देऊन कोवळा काढणारा हा अर्थसंकल्प आहे.
-भिवाजी खोटेले ज्येष्ठ नागिरक, सडक- अर्जुनी
....
व्यापारात मोठी मंदी आहे. कोरोनाने अनेकांचा व्यवसाय बुडाला. त्या व्यावसायिकांना या अर्थसंकल्पात मदत करणे आवश्यक होते; परंतु केंद्र सरकारने मध्यम किंवा छोट्या व्यापाऱ्यांसाठी भरघोस असे काहीच केले नाही.
- राजकुमार फुंडे, व्यापारी.
....
पेट्रोल, डिझेलची वाढणारी किंमत, लोकांकडे वाढणाऱ्या वाहनांची संख्या पाहता आमचा व्यवसाय मोडकळीस आला आहे. पेट्रोल, डिझेलची किंमत तर वाढत आहे; परंतु भाडे वाढ न झाल्याने आम्ही पोट कसे भरावे हे संकट आमच्यासमोर आहे.
राध्येश्याम बहेकार, ऑटो चालक
......
बेरोजगारांना निराश करणारा अर्थसंकल्प आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा रोजगार गेला; परंतु केंद्र सरकारने रोजगाराच्या संधी दिल्या नाही. केवळ आधुनिकीकरणाच्या नावावर बेरोजगारांना भूलथापा दिल्या जात आहेत. या अर्थसंकल्पात बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी नाहीत.
नरेश बोहरे युवक रिसामा.
.....
भाजीपाला विक्री करताना शेतीच्या उत्पन्नावर शेतमालाची किंमत ठरते. उत्पादन मालाच्या तुलनेत मागणी किती आणि पुरवठा किती यावर त्या मालाची किंमत ठरते. शेती उपयोगी संसाधनांची किंमत वाढल्याने शेतमालावर निश्चितच परिणाम पडेल. हा बजेट आमच्यासाठी हिताचा नाही.
-प्रेमानंद पाथोडे, भाजीविक्रेता.
.......
डिझेल आणि पेट्रोलवर ३६ रुपये केंद्र शासनाचे, तर राज्य शासनाचे २६ रुपये कर आहे. एक कर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सामान्याच्या हे आवाक्याबाहेर आहे.
- मुकेश अग्रवाल पेट्रोल पंप चालक
...........
बस स्थानकावर अर्थसंकल्पाची चर्चा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यावर येथील मरारटोली येथील बसस्थानकावर प्रवाशांमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अर्थसंकल्पात काय, शेतकऱ्यांसाठी कुठली तरतूद करण्यात आली, पेट्रोल, डिझेलवर कृषी सेस लावल्याने दरवाढीचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल, याची चर्चा करताना प्रवासी आढळले.
........
रेल्वे स्थानक
अर्थसंकल्पात नवीन रेल्वेगाड्यांची घोषणा होते काय, रेल्वे भाड्यात कपात होते काय, यासंबंधीची चर्चा गोंदिया रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये होती. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावरील सर्व कुलीसुद्धा एकत्रित बसून या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी कुठलीच तरतूद न करण्यात आल्याने त्यावर चर्चा करीत होते. तर नवीन रेल्वेगाड्यांची घोषणा न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.