राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावाचा विकास करू
By Admin | Updated: May 28, 2015 01:14 IST2015-05-28T01:14:09+5:302015-05-28T01:14:09+5:30
ग्रामोन्नतीचे आंदोलन उभे करून संयुक्तपणे लढा गावपातळीवर सुरू झाल्यास देश समर्थ होईल.

राष्ट्रसंतांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून गावाचा विकास करू
नाना पटोले : तुकडोजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व ग्रामजयंती
गोंदिया : ग्रामोन्नतीचे आंदोलन उभे करून संयुक्तपणे लढा गावपातळीवर सुरू झाल्यास देश समर्थ होईल. यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विश्वशांती व बंधूभाव टिकविण्यासाठी दिलेली सामूदायिक प्रार्थनेची व्यवस्था ही पंचायत राज संकल्पनेत गुणात्मक बदल व जनतेत सद्भावना जागृत करेल, अशी भावना खा. नान पटोले यांनी व्यक्त केली.
गुरूकुंज आश्रम मोझरीच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील गुरूदेव सेवामंडळ कातुर्ली येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व ग्रामजयंती समारंभ पार पडले. या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेली ग्रामस्वच्छता अभियान देशपातळीवर राबविण्याची घोषणा करून ‘स्वच्छ भारत-स्वच्छ भारत’ हा मंत्र दिला. राष्ट्रसंतांची ग्रामगीता कायद्याने देशात लागू करण्यासाठी आपण लोकसभेच्या माध्यमातून केंद्र शासनाला बाद्य करू, असे अभिवचन त्यांनी दिले.
याप्रसंगी मोझरी गुरूकुंज आश्रमाचे केंद्रीय प्रचारक बबनराव वानखेडे, जि.प. चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, माजी आ. भेरसिंह नागपुरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, संत बांगळूबाबा आदिवासी शिक्षण संस्थेचे संस्थापक जगदीश येळे यांनी आपले विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक आचार्य मुन्नालाल ठाकूर यांनी तर संचालन प्रा. एल.आर. राणे यांनी केले.
कार्यक्रमासाठी गुरूदेव सेवामंडळ कातुर्लीचे यादवराव मोहनकर, महादेव कोरे, संजू ओकटे, भाऊलाल तरोणे, राधेलाल भेलावे, बळीराम भेलावे, मधू गिऱ्हेपुंजे, हेमराज खोटेले, सरपंच अमृता कोरे, गुरूदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्य व सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
नोव्हेंबर महिन्यात वैनगंगा महोत्सव
खा. नाना पटोले सामुदायिक प्रार्थनेत सहभागी झाले. यानंतर तुकडोजी महाराजांची मूर्ती गावाच्या एकात्मिक व आध्यात्मिक विकासासाठी आस्थेचा केंद्र बनेल व ग्रामसभेची खऱ्या अर्थाने अंमलबजावनी होण्यास मदत होईल.
ग्रामगीतेची संकल्पना खऱ्या अर्थाने गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राबविण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रशासनाच्या मदतीने तालुका स्तरावर ‘वैनगंगा महोत्सव’ आयोजित करण्यात येईल. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांची देशात स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल.
सर्व समाजाच्या घटकांना यात समाविष्ट करून दोन्ही जिल्ह्यांच्या साधनांचा लाभ घेण्यात येईल. प्रत्येक हाताला काम व तांदळाला दर मिळण्यासाठी दरवर्षी दोन्ही जिल्ह्यात वैनगंगा महोत्सव घेण्यात येईल. याचा लाभ जिल्ह्यातील कुंभार, ढिवर, लोहार, सुतार, बुरड कामगार, चांभार, कोसा उत्पादक व शेतकरी यांना सक्षम व आत्मनिर्भर होण्यासाठी होईल. मोहफुलांसारख्या वनोपज उत्पादनाचा लाभ वनमजुरांना कसा होईल, याबाबत खा. पटोले यांनी सांगितले.