जल, जंगल, जमिनीसाठी लढा

By Admin | Updated: April 8, 2015 01:31 IST2015-04-08T01:31:15+5:302015-04-08T01:31:15+5:30

अनेक वर्षांपासून आदिवासी वन परिसरात वास्तव्यास असताना त्यांना जल, जंगल व जमिनीचा हक्क नाही.

Water, forest, fight for the land | जल, जंगल, जमिनीसाठी लढा

जल, जंगल, जमिनीसाठी लढा

विजय मानकर सालेकसा
अनेक वर्षांपासून आदिवासी वन परिसरात वास्तव्यास असताना त्यांना जल, जंगल व जमिनीचा हक्क नाही. त्यामुळे आदिवासीना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सालेकसा तालुक्यात मांझी सेना गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यात इतरही क्षेत्रात नैसर्गिक संपदेला सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा पातळीवरसुध्दा मांझी सेना गठित करण्यात आली आहे. सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जात आहे.
जिल्हा संगटनेचे मुख्यालय देवरी तालुक्यात तर सालेकसा तालुका मुख्य परगना स्थळ बेवारटोलाच्या नवीन वसाहतीत स्थापित करण्यात आले आहे. या मांझी सेनेच्या नवनिर्मितीने आदिवासी समाजात नवचैतन्य संचारलेले आहे. शासनाच्या विभागामार्फत नैसर्गिक संपतीची समृध्दी होण्याऐवजी घटच मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा परिस्थितीत मांझी सेनेसारख्या आदिवासीचे संगठनच या देशातील जल, जंगल, जमीन, पहाड, नद्या इत्यादी नैसर्गिक संपत्तीचे सरंक्षण करू शकतात, अशा विश्वास आदिवासी समाजात वाढत चालला आहे.
गणवेश सुभाषचंद्र बोस यांच्या आजाद हिंद सेनेचा, परंतु विचारधारा महात्मा गांधी यांची अंगिकार करून नैसर्गिक साधन-संपत्ती व यात निवास करण्याऱ्या भारतीय मूळनिवासी यांचे सरंक्षण करणे, हा उद्देश समोर ठेवून कंगला मांझी या क्रांतिवीराने या सेनेची कल्पना मांडली होती. त्या दिशेने काम करीत स्वातंत्र्याच्या पूर्वी व स्वातंत्र्यानंतरही आपले अभियान अविरत सुरू ठेवले. त्यांनी गणित केलेल्या मांझी सैनिकांच्या मदतीने आदिवासींच्या संपत्ती व अधिकाराचे रक्षण करण्याचे प्रयत्न केले.
भारतात स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून एका स्वतंत्र गोंडवाना राज्याच्या निर्मितीची कल्पना मांडणारे कंगणा मांझी यांचे मूळ कार्यक्षेत्र छत्तीसगड व त्या आसपासचे प्रांत राहिले असून त्यांचे मूळ नाव हिरासिंहदेव मांझी असे होते. वन-वन भटकणारे वनातील उत्पादनावर आपले जीवन जगणारे आदिवासी मूल्यवान धन संपदेच्या सान्निध्यात राहूनसुध्दा दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. हे बघून त्यांनी स्वत:ला कंगला मांझी असे नाव दिले आणि शेवटपर्यंत आदिवासींच्या उत्कर्षासाठी स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या या प्रेरणादायी जीवन कार्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही मांझी सैनिक यांचे संगठन आता देश पातळीवर काम करीत आहे.
भारताच्या गोंडवाना परिसरातील लोक प्राचीन काळापासून आतापर्यंत शक्तीशाली व बलाढ्य असूनसुध्दा गाव खेड्यात रानावनात माकडांसारखे चुपचाप बसून आहेत. ही पृथ्वी, जंगल, जलाशय आपली आहे. आम्ही या भूमिवरचे गण असूनसुध्दा चुपचाप हातात हात ठेवून बसून आहोत. आदिवासींनी कधीही दुसऱ्यांच्या हक्कावर नजर टाकली नाही. परंतु आदिवासींवर चतुर-चालाक लोकांनी नेहमी आक्रमण करून लुटण्याचा प्रयत्न केला. अनेकवेळा आदिवासींनी या गोष्टींचा विरोध केला. परंतु त्यांना योग्य दिशा देणारे नेतृत्व लाभले नाही. त्यांच्यावरील अत्याचार सुरूच राहिले. आदिवासी समाज भोळाभाबडा साधा-सरळ स्वभावाचा असल्याने याचा गैरफायदा घेत विदेशी व आक्रमणकारी लोकांनी त्यांची मौल्यवान संपत्ती लुटण्याचे काम केले. याचा परिणाम म्हणजे आदिवासी नेहमी शोषित-पीडित राहिले. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा बेलगाम दुरूपयोग झाल्याने प्रकृतीचे संतुलन बिघडत चालले आहे. या सर्व बाबींवर विचार करीत आता मांझी सैनिक संगठीत होऊन कामाला लागत आहेत. मांझी सेनेचे कार्य आणि कर्तव्य जल, जंगल, जमीन व त्यावरील मानवी जीवनासह सर्व प्राणी-पक्ष्यांचे सरंक्षण करणे, आपल्या धर्माचे पालन करणे, सर्व धर्मांचा आदर करणे, सुख, शांती व समृध्दी वाढविण्यात सदैव तत्पर राहणे, दीन-दुबळ्यांच्या मदतीसाठी धावणे, पूज्य जनांचे आदेश मानने, देश राज्यासाठी समर्पित असणे, स्वत:चे चारित्र्य पवित्र ठेवणे आणि सर्वांच्या विकासासह आपला विकास करणे.

Web Title: Water, forest, fight for the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.