शॅम्पू-सोड्याने सुरू आहे बसेसची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:15 IST2021-01-13T05:15:05+5:302021-01-13T05:15:05+5:30
कपिल केकत (लोकमत विशेष) गोंदिया : बसमध्ये प्रवासादरम्यान बाधितामुळे अन्य प्रवाशाला धोका होऊ शकतो. अशात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने बसेस ...

शॅम्पू-सोड्याने सुरू आहे बसेसची धुलाई
कपिल केकत (लोकमत विशेष)
गोंदिया : बसमध्ये प्रवासादरम्यान बाधितामुळे अन्य प्रवाशाला धोका होऊ शकतो. अशात प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने बसेस स्वच्छ ठेवण्यासाठी व कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बसेसच्या धुलाईची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत गोंदिया आगारातही शॅम्पू-सोड्याने बसेसची धुलाई सुरू करण्यात आली असल्याचे दिसत आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखता यावा, यासाठी राज्य शासनाने लालपरीची चाके थांबविली होती. मात्र, अनलॉकअंतर्गत जिल्हांतर्गत व नंतर आंतरजिल्हा परवानगी देत लालपरीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या प्रवासादरम्यान बाधित व्यक्ती बसलेल्या जागेवरून अन्य प्रवाशालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमका हाच धसका घेऊन कित्येक नागरिक एसटीचा प्रवास टाळत असल्याचे म्हणणेही वावगे ठरणार नाही. अशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखता यावा, तसेच आपल्या बसेसमधून प्रवास करणारा प्रवासी सुरक्षित राहावा, या दृष्टीने आता परिवहन महामंडळाने बसेस धुलाईची विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आतापर्यंत बसेसचे सॅनिटायझेशन, तसेच पाणी मारून धुलाई केली जात होती. मात्र, या विशेष मोहिमेंतर्गत बसेसची शॅम्प-सोड्याने चांगली घासून-घासून सफाई करायची आहे, जेणेकरून बसच्या आतमधील व बाहरेचा भाग स्वच्छ होऊन कोरोना विषाणूंचा नाश, तसेच बसमधून येणारा वास व दुर्गंधही नाहीसा होणार. यानुसार, गोंदिया आगारातही मागील ३-४ दिवसांपासून बसेस धुलाईचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
----------------------
दररोज ४ बसेसची धुलाई
गोंदिया आगाराकडे ७१ बसेस आहेत. महामंडळाच्या या उपक्रमांतर्गत आगाराकडून मागील ३-४ दिवसांपासून दररोज ४ बसेसची धुलाई केली जात आहे. यासाठी आगाराने शॅम्पू-साबण व धुलाईचे अन्य साहित्य आणले आहेत. धुलाईसाठी वर्कशॉपमधील ५ कर्मचारी लावण्यात आले असून, आत व बाहेरून बसेसची बारकाईने धुलाई केली जात आहे.
----------------------------------
नागरिकांच्या मनातील भीती दूर होणार
परिवहन महामंडळाने हाती घेतलेल्या या उपक्रमामुळे बसेसमध्ये प्रवास करायला घेऊन नागरिकांत असलेली भीती दूर होणार आहे. स्वच्छ बसेसमधून प्रवास करताना प्रवासी बिनधास्त राहणार, शिवाय यातून महामंडळाचीही प्रतिमा उंचावणार आहे.