साखरीटोलावासी पोलीस ठाण्याच्या प्रतिक्षेत
By Admin | Updated: December 2, 2014 23:10 IST2014-12-02T23:10:00+5:302014-12-02T23:10:00+5:30
आदिवासी व नक्षलग्रस्त म्हणून परिचीत असलेला सालेकसा तालुका अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या तालुक्याच्या विकासाकडे मोठ्या नेत्यांपासून तर छोट्या-मोठ्या नेते मंडळीचे सदासर्वकाळ दुर्लक्षच राहिले आहे.

साखरीटोलावासी पोलीस ठाण्याच्या प्रतिक्षेत
साखरीटोला : आदिवासी व नक्षलग्रस्त म्हणून परिचीत असलेला सालेकसा तालुका अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. या तालुक्याच्या विकासाकडे मोठ्या नेत्यांपासून तर छोट्या-मोठ्या नेते मंडळीचे सदासर्वकाळ दुर्लक्षच राहिले आहे. यात तालुक्यातील साखरीटोला (सातगाव) येथे पोलीस स्टेशनच्या प्रश्न मागील कित्येक दिवसापासून धूळखात पडला आहे. आजही साखरीटोलावासी पोलीस स्टेशनच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव फाईलच्या रुपात पडून असल्याची माहिती आहे.
तालुक्यातील साखरीटोला हे गाव देवरी-आमगाव मार्गावरील मुख्य गाव आहे. अनेक सोयी-सुविधांनी युक्त साखरीटोला मात्र पोलीस ठाण्यापासून वंचित आहे. येथे पोलीस चौकी असून ती सुध्दा बरेचदा बंद असते. सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत १०२ गावे असून साखरीटोला चौकी अंतर्गत ३२ गावांचा समावेश आहे. यात आमगाव, देवरी तालुक्यातील सुध्दा गावे आहेत. अनेकदा घटना घडल्यानंतर १५ किमी अंतरावर असलेल्या सालेकसा पोलीस ठाण्यात नागरिकांना जावे लागते. त्यातही साखरीटोला-सालेकसा मार्गावर वाहन मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे अनेकदा तक्रार करण्यासाठी विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन शासनाने साखरीटोला येथे पोलीस ठाणे तयार करण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्याकरिता जागा प्रस्तावित झाली असली तरी मंत्रालयात पोलीस ठाण्याचा प्रस्तव धुळखात आहे. (वार्ताहर)