वडाचं रोप लावून साजरी करा ‘वटपौर्णिमा’
By Admin | Updated: June 2, 2015 01:32 IST2015-06-02T01:32:33+5:302015-06-02T01:32:33+5:30
मराठीतील ज्येष्ठ महिन्यात, अर्थात पावसाळ्याच्या तोंडावर येणारा ‘वटपौर्णिमा’ हा महिलांचा सण नावाप्रमाणेच

वडाचं रोप लावून साजरी करा ‘वटपौर्णिमा’
गोंदिया : मराठीतील ज्येष्ठ महिन्यात, अर्थात पावसाळ्याच्या तोंडावर येणारा ‘वटपौर्णिमा’ हा महिलांचा सण नावाप्रमाणेच वटवृक्षाशी निगडित आहे. या सणाला केवळ पारंपरिक दृष्टीकोणातून पाहिले जात असले तरी महिला या दिवशी ज्या वडाची पुजा करतात त्या वडाचे शास्त्रीय महत्वही खूप आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने का होईना, वडाचे पूजन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.
वडाचे झाडे हे दीर्घकाळ टीकणारे असून, त्याला विपूल पर्णसंभार असतो. त्यामुळे वडाची झाडे हवा प्रदुषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदुषण नियंत्रणाचे कामही उत्तमरितीने करतात. तसेच त्यांच्या घनदाट पालवीमुळे ही झाडे हवेतील तापमान कमी करुन शीतलता देतात.
वडाच्या झाडाला वर्षभर पिकलेली फळे येत असल्यामुळे बऱ्याच प्राण्यांना व पक्ष्यांना अन्न मिळते. याची लालचुटुक फळे खायला अक्षरश: शेकडो पक्षी याच्यावर तुटून पडतात. तसेच बरेच प्राणी व पक्षी वडाच्या झाडाचा रात्रीच्या निवाऱ्यासाठी उपयोग करतात. अशा प्रकारे वटवृक्ष हा एक संपूर्ण परिसंस्थेचे उदाहरण आहे.
खेड्यातले व्यापारी वडाच्या सावलीत आपली दुकाने थाटत, त्यावरुनच त्याला बनिया, बनियन ट्री असे नाव पडले असावे. वडाचे झाड हळूहळू वाढते. तथापि आजकालच्या गतीमान जगामध्ये बहुतेक जण लागवडीसाठी जलद वाढणाऱ्या व शोभिवंत वृक्ष प्रजातींची निवड करतात. त्यामुळे पुरातन काळात जतन करण्यात आलेल्या या वृक्षांची संख्या खूप कमी झाली आहे.
पूर्वीच्या काळी स्त्रिया वडाच्या झाडाच्या ठिकाणी जाऊन वटपूजा करीत असत. तथापि आता वडाच्या झाडांची संख्या कमी झाल्याने वडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करण्याची अनिष्ठा पद्धत रुढ होत आहे. ही बाब वटपौर्णिमा साजरी करण्याच्या मूळ उद्देशाशी पूर्णत: विसंगत असून त्यामुळे उलट वडांच्या झाडांची बेसुमार छाटणी होत असते.
या अनिष्ठ प्रथेला आळा घालण्यासाठी राज्यात राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत स्थापन केलेल्या इको क्लबमधील विद्यार्थ्यांमार्फत प्रयत्न करण्यात आले.
निसर्गाकडून काही घेण्यापेक्षा निसर्गाला काही देऊन सण, उत्सव साजरे करण्यासाठी इको क्लबच्या विद्यार्थ्यांमार्फत प्रचार, प्रसार, प्रसिद्धी करण्यात आली. २०१४ साली सामाजिक वनीकरण विभागाने वडाची रोपे तयार केली होती. बऱ्याच ठिकाणी स्त्रियांच्या हस्ते रोपे लावण्यात आली आहेत. तसेच वृक्षारोपण २०१४ च्या पावसाळ्यात करण्यात आले असून या वर्षासाठीही रोपे तयार करण्याचे कार्य चालू आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘अक्षय वृक्षा’चे संवर्धन गरजेचे
या वृक्षाला फुटणाऱ्या पारंब्या व त्याचे स्वतंत्र वृक्षात होणारे रुपांतर, त्याला मिळणारे दीर्घायुष्य या गुणधर्मामुळे याला ‘अक्षय वृक्ष’ म्हटले गेले आहे.
आजकाल बऱ्याच विकासकामांसाठी पूर्वीच्या काळी लावण्यात आलेल्या वडांच्या झाडांची तोड करण्यात आली आहे.
आपल्या पूर्वजांनी वडाच्या झाडाचे महत्व ओळखून आपल्या संस्कृतीमध्ये वट पौर्णिमेच्या निमित्ताने वटपूजा करण्याची प्रथा रुढ केली.
वडाच्या लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेतला आहे. रोपांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका कुडवा येथे उपलब्ध आहेत, असे लागवड अधिकारी युवराज कुंभलकर यांनी कळविले.