जिल्ह्यात ७९१ ठिकाणी मतदार जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:21 IST2019-02-11T22:20:34+5:302019-02-11T22:21:06+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात ७९१ ठिकाणी मतदार जनजागृती
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येत्या लोकसभा निवडणुकीपासून वापरात येणाऱ्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती कार्यक्रम घेतले जात आहे. २८ डिसेंबरपासून सुरू करण्यात आलेला हा जनजागृती कार्यक्रम तालुकास्तरावर ६ तारखेला संपला असून यांतर्गत जिल्ह्यात ७९१ ठिकाणी नागरिकांत (मतदार) जनजागृती करण्यात आली आहे.
ईव्हीएम मशीन हॅक करून एका विशिष्ट पक्षालाच सर्व मते पडत असल्याचे चांगलेच आरोप करण्यात आले आहेत. यातूनच राजकीय पक्षांत ईव्हीएम मशीनला घेऊन चांगलीत जुंपलीही आहे. ईव्हीएम मशीनला घेऊन नागरिकांच्या मनात असलेली ही शंका दूर व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या जोडीला व्हीव्हीपॅट मशीन आणले आहे. ईव्हीएम मशीनचे बटन दाबून मतदान केल्यानंतर आपण बटन दाबलेल्या पक्षालाच आपले मत गेले की नाही याची पावती व्हीव्हीपॅट मशीनमधून निघणार आहे. मात्र ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचा हा प्रयोग नागरिकांसाठी सध्या नवखाच आहे.
यामुळे ईव्हीएम-व्हीव्हीपॅटला घेऊनही नागरिकांत विविध प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. या शंकांचे निरसन न झाल्यास नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यास टाळतील याचाही नेम नाही. अशात नागरिकांच्या मनात असलेली ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबतची शंका दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती कार्यक्रम राबविला. येत्या लोकसभा निवडणुकीपासून ईव्हीएम-व्हीव्हीपॅटनेच निवडणुका होणार असल्याने २८ डिसेंबर पासून जिल्ह्यात हा जनजागती कार्यक्रम सुरू करण्यात आला. यांतर्गत जिल्हा व तालुकास्तरावर पथक गठीत करण्यात आले होते.
या जिल्हा व तालुकास्तरावरील पथकांनी ६ तारखेपर्यंत जनजागृती कार्यक्रम राबवून जिल्ह्यात ७९१ ठिकाणी जनजागृती केली.
यात पथकाने नागरिकांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनची कार्यपद्धती समजावून सांगत मतदानाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. एवढेच नव्हे तर नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.
निवडणुकीत जास्तीतजास्त नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा या उद्देशातून जिल्हा प्रशासनाने हा कार्यक्रम घेतला.
८ तालुका तर १ जिल्हास्तरीय पथक
जनजागृतीसाठी तालुकास्तरावर ८ तर जिल्हास्तरावर १ पथक गठीत करण्यात आले आहे. ६ जणांच्या या पथकांत मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचाºयांचा समावेश होता. तालुकास्तरावरील पथकांनी मतदान केंद्र, बाजार, चौक यासारख्या गर्दीच्या ठिकाणांवर जनजागृती कार्यक्रम घेतले. तर जिल्हा पथकाने शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालय, मेळावे व मोठ्या प्रमाणात गर्दी असलेल्या कार्यक्रमांत जनजागृती कार्यक्रम घेवून जनजागृतीचे कार्य केले. विशेष म्हणजे, तालुकास्तरावरील पथकांचे कार्यक्रम झाले आहेत. मात्र जिल्हास्तरीय पथक कार्यरत असून मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन बघून ते जनजागृती करीत आहेत.