एकोपा जपतेय सीमेवरील गाव
By Admin | Updated: October 30, 2014 22:53 IST2014-10-30T22:53:15+5:302014-10-30T22:53:15+5:30
छोट्या-छोट्या कारणातून धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या आणि त्यातून समाजमन कलुषित होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. पण जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या आणि छत्तीसगड सिमेपासून

एकोपा जपतेय सीमेवरील गाव
धार्मिक सलोखा : हिंदू-बौध्दांची एकाच ठिकाणी पूजा
मनिष मोटघरे - ककोडी
छोट्या-छोट्या कारणातून धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या आणि त्यातून समाजमन कलुषित होण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. पण जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या आणि छत्तीसगड सिमेपासून अवघ्या दिड किलोमीटवर असलेल्या मुरमाडी या छोट्याशा गावाने मात्र धार्मिक सलोख्याचा अनोखा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. या गावात चक्क हिंदू देवीदेवतांसोबत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीचेही पुजन केले जाते.
ककोडीपासून ४ किलोमीटर असलेल्या मुरमाडी या गावाची लोकसंख्या ८०० आहे. येथे गोंड (आदिवासी) समाजाचे, शिधार (कंवर), गोवारी, बौद्ध समाज आणि साहू समाजातील लोक राहतात. त्यात गोंड व शिधार समाजाचे लोक सर्वाधिक आहेत. पण गावात कधीही कोणत्या भांडण-तंट्याचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जात नाही. कोणात काही वाद झालाच तर तो गावाच्या सीमेबाहेर जाऊ न देता गावातच मिटविला जातो.
गावकऱ्यांनी १० वर्षापूर्वी एका सामूहिक मंदिराची कल्पना मांडली आणि त्याला कोणीही आक्षेप न घेता सर्वांना ती कल्पना आवडली. गावाबाहेरच्या तळ्याकाठी असलेल्या ग्रामपंचायतच्या मोकळ्या जागेत मंदिर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. पाहता पाहता गावकऱ्यांनी त्यासाठी लोकवर्गणी गोळा केली. सर्वांनी ऐपतीप्रमाणे आपला वाटा उचलला. जवळपास ३ रुपयांचा खर्च मंदिर उभारणीसाठी लागला. त्यासाठी गावकऱ्यांनी जमेल तेवढे श्रमदानही केले. शेवटी त्या मंदिरात वेगवेगळे गाभारे करीत त्या ठिकाणी कालीमाता, राम-लक्ष्मण-सीता, दुर्गादेवी, शंकराची मूर्ती आणि भगवान गौतम बुद्धाची मूर्ती स्थापित करण्यात आली. मंदिराच्या देखभालीसाठी एका पुजाऱ्याचीही नियुक्ती गावकऱ्यांनी केली. या गावात प्रत्येक धर्माचा सण-उत्सव एकोप्याने साजरा केला जातो. दुर्गाउत्सव, रामनवमी, बौद्ध पौर्णिमा, गुरू पौर्णिमा, मागी पौर्णिमा असे सर्व कार्यक्रम गावात सर्वजण मिळून साजरे करतात.
एकोप्याचे प्रतिक झालेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी तत्कालीन सरपंच नामसिंग उईके, तत्कालीन पोलीस पाटील स्व.नारायण अट्टलखा, मुकूंद शहारे, प्रल्हाद सोनार, भगवान शहाडा, संतू ताराम, रामलाल मडावी, श्याम सोनार, भगवानसिंग केवास, माधव कुवरदादरा, कोदू सोनार, कमलेश सोरी, माखन कुंभरे, कीर्तन पायफूल, स्व.मंगलू सोरी (वैद्यराज) आदींनी पुढाकार घेतला होता.