Vidarbha Mission 2023 for Independent Vidarbha | स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ मिशन २०२३
स्वतंत्र विदर्भासाठी विदर्भ मिशन २०२३

ठळक मुद्देराम नेवले : आंदोलन अजून तीव्र करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या ७ वर्षापासून स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी लढा देत आहे. अनेक आंदोलने समितीने केली आहेत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना छत्तीसगड, झारखंड व उत्तरांचल हे तीन राज्य दिले. परंतू विदर्भ राज्य शिवसेनेच्या विरोधामुळे दिले नाही. आता मात्र भाजप-सेना युती तुटली व त्यामुळे भाजपाची विदर्भ विरोधी भूमिका संपुष्टात येईल. विदर्भ मिळण्याचा राजकीय मार्ग मोकळा झाला. अशावेळी स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे विदर्भ मिशन २०१३ समोर ठेवून आंदोलन अधिक तिव्र करण्याचा निर्धार समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी येथील सभेत बोलून दाखविला.
ही सभा सामजिक ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश धुर्वे यांच्या अध्यक्षतेत समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, राजेशकुमार तायवाडे, राजू बरियेकर, पवनकुमार येरपुडे, राधेलाल पटले, रामकृष्ण आगाशे, वासुदेव कुर्वे, भूमेश्वर पारधी, राजेश रहांगडाले, अतिचंद पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी धुर्वे यांनी, विदर्भ राज्य वेगळे झाल्यास कोणकोणते फायदे होतील हे सविस्तर सांगितले. मामर्डे यांनी, विदर्भ राज्य हे कसे विकसित राज्य होईल याचा लेखा-जोखाच मांडला. तर तायवाडे व पटले यांनीही विदर्भ राज्य कसे विकसित होऊ शकते व बेरोजगारी कशी दूर होऊ शकते यावर मार्गदर्शन केले. स्वतंत्र विदर्भ राज्य ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कसे मिळवून घेता येईल यासाठी आंदोलनाचे व इतर कार्यक्रमाचे अ‍ॅक्शन प्लान तयार केले आहे. त्याला नाव दिले अ ाहे ‘विदर्भ मिशन २०२३’
विजेचे बिल निम्मे झाले पाहिजे, कर कर्जा नही देंगे, बिजली बिल भी नहीं देंगे, जनजागृती करणे, फलक लावणे, २ डिसेंबरपासून सुरु झाले. २४ डिसेंबर रोजी जिल्हा, तालुका स्तरावर एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण सकाळी १० ते ५ पर्यंत जिल्हास्तरावर विविध मागण्यांसाठी धरणे व आंदोलन, अकोला १५ जानेवारी, अमरावती १७, नागपूर २०, चंद्रपूर २२, गोंदिया २४ जानेवारी.
१० फेब्रुवारीला सर्व तालुका, जिल्हा स्तरावर रास्ता रोको, जेल भरो आंदोलन, २५ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे रेल रोको आंदोलन, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी काळा दिवस पाळून ‘संपूर्ण विदर्भ बंद’ हे आंदोलन राबविण्यात येणार आहे. संचालन तायवाडे यांनी केले. प्रास्ताविक पारधी यांनी मांडले. आभार आगाशे यांनी मानले. सभेसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Vidarbha Mission 2023 for Independent Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.