रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांची दुरवस्था
By Admin | Updated: March 18, 2017 01:57 IST2017-03-18T01:57:00+5:302017-03-18T01:57:00+5:30
शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसाय आहे. अनुदानावर शेतकऱ्यांना पशुधन पुरविले जाते.

रिक्त पदांमुळे पशुवैद्यकीय रुग्णालयांची दुरवस्था
शेतकऱ्यांची गैरसोय : अनेक ठिकाणी डॉक्टरांसह कर्मचारीही नाही
देवरी : शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसाय आहे. अनुदानावर शेतकऱ्यांना पशुधन पुरविले जाते. तसेच इतर नागरिकही हजारो रुपयांचे कर्ज घेऊन पशुधन खरेदी करतात. परंतु अशा पशूंची (जनावरांची) प्रकृती बिघडल्यास तालुक्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे पशूंची वाट लागत आहे. अशा गंभीर बाबींकडे लक्ष देऊन शासनाकडे पाठपुरावा करुन तालुक्यातील पशु वैद्यकीय रुग्णालयाची दुरवस्था त्वरित दूर करावी, अशी मागणी गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसाय आहे. कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शासनाकडून विविध योजनेतून आणि अनुदानावर पशुधन खरेदी केली. तसेच इतर नागरिकांनी सुद्धा हजारो रुपयाचे कर्ज घेऊन पशुधन खरेदी केली आहे. पशु (जनावरांच्या) उपचाराकरिता येथे तालुका पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ आहे. या दवाखान्यात मंजूर पाच पदे आहेत. यात सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, वरिष्ठ लिपीक, ड्रेसर आणि परिचर यांचा समावेश आहे. परंतु या ठिकाणी पशुधन विकास अधिकारी, ड्रेसर व परिचरचे पद रिक्त आहे.
तसेच तालुक्यात नऊ ठिकाणी राज्यस्तरीय पशुवैद्यकीय श्रेणी-२ चे दवाखाने आहेत. यात फुटाणा, चिचगड, ककोडी, डोंगरगाव (सावली), मुल्ला, डवकी, डोंगरगाव (सडक), डोंगरगाव (खजरी) आणि डव्वा या ठिकाणांचा समावेश आहे. या नऊ ठिकाणी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व परिचर असे नऊ-नऊ मंजूर पदे आहेत. त्यापैकी फुटाणा, चिचगड, ककोडी, डोंगरगाव (सावली), मुल्ला, डोंगरगाव (सडक), डोंगरगाव (खजरी) आणि डव्वा या आठ ठिकाणी पशु विकास अधिकारीची पदे रिक्त आहेत. तर ककोडी, डोंगरगाव (सावली) डवकी, डोंगरगाव (सडक) आणि डोंगरगाव (खजरी) अशा पाच ठिकाणी परिचराची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत पशूंची प्रकृती बिघडल्यास पशुविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभावी उपचार वेळेवर न झाल्याने काही महिन्यातच अशा पशूंची वाट लागत आहे.
दवाखान्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अभावी आणि औषधाचा तुटवडा यामुळे हे रुग्णालय मोडकळीस आले आहे. अशा दुरवस्थेत पशूंना उपचाराकरिता नेणे म्हणजे पशूला मृत्यूच्या दाढेत ढकलने होय. मग अशा परिस्थितीत पशु तपासणीचे प्रशिक्षण घेतलेले काही सुशिक्षीत तरुण स्वत:ला पशुचे डॉक्टर असल्याचे सांगत खाजगी दुकानातून औषधी व हातात बॅग घेऊन ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात जाऊन राजसोरपणे पशुवर उपचार करीत आहेत. यात पशुधन पालक डॉक्टर गावातच उपलब्ध होत असल्याने त्या डॉक्टराकडून जनावरांवर उपचार करवून घेत आहे. तर पशुवैद्यकीय दवाखान्यातील चपराशी सुद्धा स्वत:ला डॉक्टर असल्याचे सांगत पशुंवर अघोरी उपचार करीत पैशाची लुट करीत आहेत.
आधीच निसर्गाच्या अवकृपेने हवालदिल झालेल्या या शेतकऱ्यांवर उपचाराअभावी लाख मोलाची जनावरे मृत्युमुखी पडल्याने त्यांच्यावर मोठे आभाळ कोसळत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पशुवैद्यकीय दवाखाने महत्वाचे आहेत. (प्रतिनिधी)