इन्स्टॉलेशन अभावी व्हेंटिलेटर धूळखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST2020-08-19T05:00:00+5:302020-08-19T05:01:29+5:30
ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटरअभावी रूग्णांची गैरसोय व जीव धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २० लाख रु पयांची तरतूद व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी करण्यात आली.

इन्स्टॉलेशन अभावी व्हेंटिलेटर धूळखात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील ५ महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. अशा स्थितीत व्हेंटिलेटरचा तुटवडा जावू नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या २० लाख रूपयांच्या निधीतून १२ व्हेंटिलेटर खरेदी करण्यात आले. मात्र मागील महिनाभरापासून इन्स्टॉलेशन अभावी व्हेंटिलेटर तसेच धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
ऑक्सिजन अभावी एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने कुठलाच धडा घेतला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार दररोज पुढे येत आहे. कोरोना संसर्गाच्या काळात व्हेंटिलेटरअभावी रूग्णांची गैरसोय व जीव धोक्यात येऊ नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून २० लाख रु पयांची तरतूद व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी करण्यात आली. यानंतर मेडिकलने एका खाजगी कंपनीच्या माध्यमातून महिनाभरापूर्वी १२ व्हेंटिलेटरची खरेदी केली. हे व्हेंटिलेटर इन्स्टॉलेशन करण्यासाठी संबंधित कंपनीचे टेक्नीशियन आले होते. मात्र काही तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. तसेच व्हेंटिलेटर कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर नसल्याने मागील महिनाभरापासून १२ व्हेंटिलेटर तसेच धूळखात पडले आहेत.
विशेष म्हणजे, सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशात व्हेंटिलेटरची केव्हाही गरज पडू शकते. यामुळे त्या दृष्टिकोनातून मेडिकलने यावर वेळीच उपाययोजना करून व्हेंटिलेटर कनेक्ट करून इन्स्टॉलेशन करण्याची गरज होती. मात्र तसे न केल्याने हे व्हेंटिलेटर तसेच पडून आहे. जिल्हा प्रशासनाने गरज ओळखून निधी उपलब्ध करून दिला. मात्र मेडिकलच्या वेळकाढू धोरणामुळे या व्हेंटिलेटरचा कसलाच उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, राज्यात काही ठिकाणी व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण झाला आहे व अडचण निर्माण होत आहे. तर गोंदिया जिल्ह्यात मात्र उलटे चित्र आहे. या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष झाले आहे. जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करु न दिल्यानंतर त्याचा योग्य उपयोग झाला की नाही याची सुद्धा चाचपणी केली नाही.
जिल्हा नियोजन समितीतून प्राप्त २० लाख रु पयांच्या निधीतून १२ व्हेंटिलेटर एका खासगी कंपनीकडून खरेदी करण्यात आले. मात्र कनेक्टर अभावी त्यांचे इन्स्टॉलेशन अद्याप झालेले नाही. जेव्हा पर्यंत इन्स्टॉलेशन पूर्ण होणार नाही तेव्हा पर्यंत त्या कंपनीला बिल देण्यात येणार नाही. लवकरात लवकर व्हेंटिलेटरचे इन्स्टॉलेशन करण्याचे निर्देश या कंपनीला दिले आहे.
- व्ही.पी.रु खमोडे
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया
माहिती लपविण्याचा प्रकार सुरु च
मागील काही दिवसांपासून क्वारंटाईन आणि कोविड केअर सेंटरमधील अनागोंदी कारभार पुढे येत आहे. तर आरोग्य विभागाकडून आपल्या अनागोंदी कारभाराची पोलखोल होवू नये यासाठी कोरोना बाधित आणि मृतांची माहिती लपविली जात आहे.