उपोषणाच्या आठव्या दिवशी वाहनचालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:06+5:30
मागील आठ दिवासांपासून सुरू असलेल्या संपामुळे सर्वच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अश्कोम मीडिया प्रा.लि.कंपनी अंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जात आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून कंत्राटी तत्वावर ७८ रुग्णवाहिका चालकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे

उपोषणाच्या आठव्या दिवशी वाहनचालकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अश्कोम मीडिया प्रायव्हेट लिमीटेड कंपनी (भोपाल) अंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य विभागात ७८ रुग्णवाहिका चालक कंत्राटी तत्त्वावर मागील वर्षभरापासून कार्यरत आहेत. कंपनीकडून त्यांना २४ तास अल्पशा मानधनावर राबवून घेतले जात आहे. सोयी सुविधा दिल्या जात नसल्यामुळे या ७८ रुग्णवाहिका चालकांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन व बेमुदत उपोषणाला १८ नोव्हेंबरपासून सुरूवात केली आहे. परंतु उपोषणाच्या आठव्या दिवशी सोमवारी (दि.२५) मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहनचालक प्रेमभाऊ पिकलमुंडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
मागील आठ दिवासांपासून सुरू असलेल्या संपामुळे सर्वच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अश्कोम मीडिया प्रा.लि.कंपनी अंतर्गत जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेची सेवा पुरविली जात आहे. यासाठी कंपनीने जिल्ह्यात १ ऑक्टोबरपासून कंत्राटी तत्वावर ७८ रुग्णवाहिका चालकांची कंत्राटी तत्वावर नियुक्ती केली आहे. या रुग्णवाहिका चालकांना अल्पशा मानधनावर २४ तास राबवून घेतले जात आहे. मानधनात वाढ करण्याच्या मागणीसह अन्य सोयी सुविधा लागू करण्यात याव्या यासाठी रुग्णवाहिका चालकांनी अनेकदा कंपनीकडे पाठपुरावा केला. मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सर्व ७८ रुग्णवाहिका चालकांनी १८ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन व जि.प.समोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे.
परिणामी ७८ रुग्णवाहिकांची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. केंद्र शासनाने २४ जुलै २०१९ पासून लागू केलेल्या नियमानुसार कामगारांच्या बेसीकमध्ये वाढ करुन तीन जुलै २०१९ पासून लागू करण्यात यावी, साप्ताहिक सुट्टी, वैद्यकीय रजा देण्यात यावी, कामाचे ८ तास निश्चित करुन सुटीची वेळ निर्धारीत करावी, ८ तासांपेक्षा अधिक काम केल्यास त्याचा अतिरिक्त मोबदला देण्यात यावा, शासनाने लागू केलेल्या सोयी सुविधा देण्यात याव्या, आॅक्टोबर २०१८ पासूनची ईएसआयसी रक्कम देण्यात यावी आदी मागण्यांना घेऊन उपोषण सुरू करण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे.
या संपात सहभागी होण्यासाठी मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाहन चालक प्रेमभाऊ पिकलमुंडे हे येत असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तिव्र झटका आल्यामुळे त्यांचा रस्त्याच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू बद्दल हळहळ व्यक्त होत आहे.