वरुणराजाची अवकृपा कायम
By Admin | Updated: July 18, 2014 00:09 IST2014-07-18T00:09:16+5:302014-07-18T00:09:16+5:30
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील

वरुणराजाची अवकृपा कायम
केवळ आठ टक्के रोवण्या : पाऊस लांबल्यास परिस्थिती बिकट
गोंदिया : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस बरसत असला तरिही वरुणराजाने अद्यापही आपली दमदार हजेरी लावली नाही. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ आठ टक्केच रोवणीची कामे पूर्ण झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. पाऊस लांबल्याने रोवणीची कामे पूर्णत: खोळंबली आहेत.
जिल्ह्यातील शेती आजही बऱ्याच प्रमाणात वरथेंबी पावसावर अवलबंून आहे. त्यामुळे पाऊस समाधानकारक पडल्यास उत्पन्न चांगले होते हे आजवरचे चित्र आहे. मात्र यावर्षी पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने आधी पेरणी व आता रोवणीचे कामे खोळबंली आहेत. शेतकरी बांधव १५ जुलै पासून रोवणीच्या कामाला सुरुवात करतात. रोवणी करण्याची अंतीम मुदत १५ आॅगस्ट पर्यंत असते. यापेक्षा उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता असते. यावर्षी मात्र अद्याप केवळ आठ टक्के रोवणी झाली असून अजूनही ९२ टक्के रोवण्या शिल्लक आहेत. यामुळेच शेतकऱ्यांनी आवत्यांवर भर दिला असून सुमारे ६० टक्के आवत्या झाल्या आहेत. तर पावसाचे प्रमाण देखील सरासरी १८५ आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार आतापर्यंत ५५० मिमी. पाऊस झाला असता तर रोवणीचे चित्र चांगले असते. मात्र यावर्षी दररोज ढगाळ वातावरण राहत असून पाऊस पडत नसल्याने चिंता वाढली आहे. येत्या आठ दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास धानाच्या पऱ्ह्यावर किड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांचीच केवळ रोवणीची कामे सुरु आहे.
तर जवळपास ९२ टक्के शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळी परिस्थितीची टांगती तलावर कायम आहे. (शहर प्रतिनिधी)