धानाचे पऱ्हे वाढले; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट
By Admin | Updated: July 7, 2014 00:00 IST2014-07-07T00:00:53+5:302014-07-07T00:00:53+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या

धानाचे पऱ्हे वाढले; बळीराजावर दुबार पेरणीचे संकट
कोसमतोंडी : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सडक/अर्जुनी तालुक्यातील बळीराजाला बसत चालला असून दुष्काळसदृश परिस्थितीचे चित्र तालुक्यात निर्माण होऊ पाहत आहे. पाण्याअभावी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे पऱ्हे वाळले असून बळीराजांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
मागील हंगामात सरासरी धानाचे उत्पन्न कमी झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे दु:ख पचवू न शकणाऱ्या बळीराजावर यंदाही संकटाचे डोंगर निर्माण होण्याची शक्यता आहे. धानाचे मुख्य पीक घेणाऱ्या सडक/अर्जुनी तालुक्यावर सध्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. पावसाअभावी धानाचे पऱ्हे वाळले आहेत. पावसाचे मृग व आर्द्रा दोन्ही नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षीही दुष्काळ सहन करावा लागणार आहे. यावर्षी तरी चांगले पीक येईल या हेतूने महागड्या धानाचे बियाणे घेऊन परिसरातील शेतकऱ्याने भात पिकाचे पऱ्हे भरले आहे. पावसाने आतापर्यंत हजेरी न लावल्यामुळे पऱ्हे पाण्याअभावी मरत आहेत. पऱ्हेच मेल्यामुळे रोवणे कसे करावे, ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, अशा शेतकऱ्याने फक्त आपली पऱ्हे जगविली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय नाही असे शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. कोरडवाहू जमिनीत कमी दिवसात निघणाऱ्या धानाची रोवणी केली जाते.
त्या धानाचे रोवणे वेळेवर झाले नाही तर धान्य पिकण्याची शाश्वती नसते. १५ दिवसांपूर्वी पावसाची रिमझीम सुरू झाली होती. त्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तो मोठ्या उत्साहाने शेतीच्या कामाला लागला होता. यावर्षी पावसाळा चांगला राहील पीक भरपूर येईल, अशी आशा शेतकरी बाळगून होता.
परंतु पावसाने शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. महागडे बी-बियाणे पेरले व नांगरणी-वखरणी केली. त्यामुळे जवळ होता नव्हता तो ही पैसा खर्च झाला आहे. जर वेळेवर रोवणी झाली नाही तर त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी दररोज आकाशाकडे पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून पाहत आहे. (वार्ताहर)