लाचिंग ड्राईव्ह अंतर्गंत १७५ फ्रंट लाईन योद्ध्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST2021-01-13T05:16:31+5:302021-01-13T05:16:31+5:30

कोरोनाची लस आल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणा दरम्यान कुठल्याही अडचणी येऊ नये, तसेच काय अडचणी येतात यासाठी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन ...

Vaccination of 175 front line warriors under Latching Drive | लाचिंग ड्राईव्ह अंतर्गंत १७५ फ्रंट लाईन योद्ध्यांना लस

लाचिंग ड्राईव्ह अंतर्गंत १७५ फ्रंट लाईन योद्ध्यांना लस

कोरोनाची लस आल्यानंतर प्रत्यक्षात लसीकरणा दरम्यान कुठल्याही अडचणी येऊ नये, तसेच काय अडचणी येतात यासाठी कोरोना लसीकरणाचा ड्राय रन नुकताच घेण्यात आला. देशभरात सर्वच ठिकाणी ड्राय रन यशस्वी झाल्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरण मोहीम राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. याला कोरोना लाचिंग ड्राईव्ह असे नाव देण्यात आले आहे. १६ जानेवारी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्यक्षात लसीकरण करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण सात केंद्रावर फ्रंट लाईन कोरोना योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय, बीजीडब्ल्यू रुग्णालय, रजेगाव ग्रामीण रुग्णालय, खमारी प्राथमिक आरोग्य केंद्र, तिरोडा उपजिल्हा रुग्णालय, सडक अर्जुनी ग्रामीण रुग्णालय, देवरी ग्रामीण रुग्णालय आदी केंद्राचा समावेश आहे. या केंद्रावर प्रत्येकी २५ आराेग्य कर्मचाऱ्यांना कोविडचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी लसीकरण मोहीम सहभागी असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देऊन ड्राय रन घेतला जात आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक हे नियमित आढावा घेत आहे. १६ जानेवारीला लॉचिंग ड्राईव्ह अंतर्गत १७५ फ्रंट लाईन योद्ध्यांना प्रत्यक्षात लसीकरण करण्यात येणार असल्याने लसीकरणाबाबतची उत्सुकता आता संपली आहे.

......

एका व्यक्तीला लसीकरणासाठी लागणार ४० मिनिटे

कोविड लसीकरणासाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर लस घेण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याला एकूण तीन प्रक्रियेतून जावे लागणार आहे. पहिल्यांदा मोबाईलवर आलेल्या मॅसेजनुसार केंद्रावर नोंदणी क्रमांक तपासणे, आरोग्य विभागाच्या ॲपवर नोंदणी व त्याची पडताळी, त्यानंतर लसीकरण केले जाणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास कुठला त्रास होत नाही यासाठी निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे.

........

लसीकरण बूथवर या गोष्टींची चाचपणी

ज्या ठिकाणी फ्रंट लाईन योद्ध्यांना प्रत्यक्षात लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशस्त तीन खोल्या, भरपूर सूर्यप्रकाश पडेल असे ठिकाण, सातत्याने वीज पुरवठ्यासाठी जनरेटर, संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असल्याने इंटरनेटची सुविधा, शीतकरण केंद्र,ऑक्सिजन सिलिंडर आदी गोष्टींची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या या गोष्टींची चाचपणी केली जात आहे.

........

सकाळी ९ वाजतापासून होणार लसीकरण

१६ जानेवारील जिल्ह्यातील एकूण ८ केंद्रावर कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सकाळी ९ ते दुपारी २ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. एका केंद्रावर एका दिवशी केवळ २५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली.

Web Title: Vaccination of 175 front line warriors under Latching Drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.