रस्ता बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर
By Admin | Updated: July 12, 2014 23:44 IST2014-07-12T23:44:28+5:302014-07-12T23:44:28+5:30
गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी येथे रस्ता खडीकरणाच्या कामात निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. विशेष म्हणजे ग्राम पंचायत पदाधिकारी आपल्या मर्जीतील कंत्राटदाराच्या माध्यमातून

रस्ता बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर
दोषींवर कारवाईची मागणी : गावकऱ्यांचे साखळी उपोषण
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील ग्राम मोहाडी येथे रस्ता खडीकरणाच्या कामात निष्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात आहे. विशेष म्हणजे ग्राम पंचायत पदाधिकारी आपल्या मर्जीतील कंत्राटदाराच्या माध्यमातून हे काम करवून घेत आहेत. त्यामुळे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी गावकरी करीत आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या मागणीसाठी गावातील काही युवकांनी साखळी उपोषण सुरू आहे.
१३ व्या वित्त आयोगांतर्गत गावात रस्ता खडीकरणाचे काम केले जात आहे. सदर रस्त्याचे काम ग्राम पंचायतमार्फत त्यांच्या मर्जीतील कंत्राटदाराकडून करविले जात आहे. मात्र कंत्राटदार यात निष्कृष्ट दर्जाच्या गिट्टी व मुरूमाचा वापर करीत असल्याचा आरोप लेकेश सोहमलाल कावळे यांच्यासह अन्य युवक करीत आहेत. तर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनाही तक्रार करण्यात आली. यावर सहायक अभियंता बिसेन यांनी ग्राम पंचायतला पत्र पाठवून काम थांबविले होते. तसेच निष्कृष्ट साहीत्य उचलून प्रमाणीत गिट्टी व मुरूम वापरण्याचे सुचविले होते. मात्र ग्राम पंचायत पदाधिकारी, कंत्राटदार व सहायक अभियंता संगनमत करून आपल्या मर्जीने रस्ता बांधकाम करीत आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांनी ग्राम पंचायतच्या ठरावालासुद्धा बगल दिली असून त्यांचाच मनमर्जी कारभार सुरू आहे. यावर सदर बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत गावातील लेकेश कावळे, योगेंद्र बिसेन, जितेंद्र कावळे, डुलीराम चव्हाण, बाबूलाल चव्हाण, यशवंत खरोले, सेवकराम येळे व जीवन कटरे यांनी ९ जुलैपासून ग्राम पंचायत कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. तर येत्या १५ तारखेपर्यंत दोषींवर कारवाई न झाल्यास १६ जुलैपासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा लेकेश कावळे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. (शहर प्रतिनिधी)