अघोषित भारनियमनाने जिल्हावासी त्रस्त
By Admin | Updated: February 12, 2015 01:21 IST2015-02-12T01:21:36+5:302015-02-12T01:21:36+5:30
राज्यात सतत होणारे भारनियम मुक्त करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या ...

अघोषित भारनियमनाने जिल्हावासी त्रस्त
गोंदिया : राज्यात सतत होणारे भारनियम मुक्त करून शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून शेतीमालाला योग्य भाव देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या शासनाने मात्र या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केले. त्यातही महावितरणकडून अघोषित भारनियमन सतत होत असल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी रबी हंगामातील पिके लावली आहेत त्यांनाही मोठा फटका या भारनियमनाचा बसत आहे.
भारनियमनमुक्त राज्याची घोषणाच आता फुसका बार ठरत असल्याचे जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे या मुख्य समस्येला घेऊन एकाही पक्षाने आवाज उचलला नसून उन्हाळ्याची चाहूल काही काळानंतर सुरू होणार असल्याने आतापासूनच महावितरणने भारनियमन करण्याला सुरूवात केली काय, असा सवालही आता उपस्थित झाला आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरातील भारनियमनात कपात करण्यात आली होती. तर ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा सहा तास खंडित करण्यात येत होता. पण आता ५-६ दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात अघोषित भारनियमन करण्यात येत असल्याने नागरिकांची चांगलीच कोंडी होत आहे. खरीपातील पिकांची मळणी आटोपल्यानंतर शेतकरी रबी हंगामाच्या पीक लागवडीकडे वळला आहे. त्यासाठी हजारो शेतकरी कृषी पंपाचा वापर करीत आहेत. मात्र भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)