विनाअनुदानित शिक्षकांची पुन्हा थट्टाच
By Admin | Updated: December 29, 2014 23:45 IST2014-12-29T23:45:40+5:302014-12-29T23:45:40+5:30
जिल्ह्यात अनेक विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकला नाही.

विनाअनुदानित शिक्षकांची पुन्हा थट्टाच
गोंदिया : जिल्ह्यात अनेक विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये विनावेतन अध्यापनाचे काम करीत आहेत. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी वेतनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागू शकला नाही.
नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात काही निर्णय होईल, अशी अपेक्षा या शिक्षकांना होती. मात्र अधिवेशनातूनही काहीच हाती न लागल्याने शिक्षकांमध्ये नैराश्य पसरले आहे. डीएड्, बीएड्, एम.ए.एमएस्सीच्या पदव्या घेऊन सुशिक्षित बेरोजगार नोकरी मिळविण्याच्या स्पर्धेत उतरले. त्यातील काहींना कायमस्वरूपी बड्या पगाराच्या नोकऱ्या लागल्या. ज्यांना अशा नोकऱ्या मिळाल्या नाहीत, त्यांनी खासगी शैक्षणिक संस्थांचा आधार घेतला. आज ना उद्या अनुदान मिळेल या आशेने यातील अनेकांनी संस्थांना डोनेशनही दिले. मात्र गेल्या १० वर्षांपासून त्यांची अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे. शासनाच्या धोरणानुसार काही शाळांना ‘कायम विनाअनुदानित’ म्हणून घोषित करण्यात आले. मात्र पुढे त्यातील कायम हा शब्द वगळल्याने खासगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमध्ये विनावेतन विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्यात. टप्प्या-टप्प्याने शाळांना अनुदान दिले जाईल, असे आश्वासन शासनस्तरावर देण्यात आले. परंतु १० वर्षांचा कालावधी लोटूनही शाळांना अनुदान देण्यात आले नाहीत. त्यामुळे शाळांचे व त्यात काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. (प्रतिनिधी)