Unpleasant incidents of loss in the district | जिल्ह्यात नुकसानीच्या २९६ अप्रिय घटना
जिल्ह्यात नुकसानीच्या २९६ अप्रिय घटना

ठळक मुद्देचौघांचा जीव गेला : घर-गोठ्यांची पडझड, मुक्या जनावरांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदाच्या मान्सूनमध्ये फक्त दोन महिन्यातच जिल्ह्याला झोडपून टाकले असून यातून नुकसानीच्या २९६ अप्रिय घटना घडल्या आहेत. १ जून ते ३१ जुलै या कालावधीतील ही आकडेवारी असून विशेष म्हणजे, यात चौघांचा जीव गेला असून घरे-गोठ्यांची पडझड झाल्यास सोबतच मुक्या जनावरांच्या मृत्यूचीही नोंद आहे.
जिल्ह्यात यंदा पाऊस आपल्या मर्जीने बरसल्याचे दिसत आहे. कधी दमदार कधी दडी मारत यंदा पावसाचे दोन महिने निघून गेले. सध्या जिल्ह्यात पाऊस सुरूच असून या पावसामुळे जिल्हावासीयांना दिलासाही मिळाला आहे. दमदार पावसाच्या एंट्रीमुळे शेती फुलत असून शिवाय दुष्काळाचे सावटही काही प्रमाणात दूर झाल्याचे दिसत आहे. एकंदर पावसाच्या भरवशावरच कित्येकांचे चेहरे फुलतात. मात्र याच पावसामुळे काहींना दु:खाच्या सागरातही ओढून नेले असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मॉन्सूनचे परिणाम जाणून घेतले असता नुकसानीच्या २९६ अप्रिय घटनांची नोंद आहे. यात प्राणांतीक अपघाताच्या चार घटनांचा समावेश असून ११ मुक्या जनावरांच्या मृत्यूच्या तर घर-गोठ्यांच्या पडझडीच्या २८१ घटनांचा समावेश आहे.
प्राणांतीक अपघातांच्या घटना बघितल्यास त्यात वीज पडून एकाचा तर पाण्यात बुडून तीघांचा अशाप्रकारे चौघांचा जीव गेला आहे. त्याचप्रकारे, जनावरांच्या मृत्यूंच्या नोंदीत सहा मोठी दुधाळ जनावरे, चार लहान दुधाळ जनावरे व एक ओढकाम करणाऱ्या लहान जारवराचा अशाप्रकारे एकूण ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कच्च्या घरांचे सर्वाधिक नुकसान
नुकसानीच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात घर-गोठ्यांच्या पडझडीच्या सर्वाधिक घटना घडल्या असून त्यातही कच्च्या घरांच्या नुकसानीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. यात, अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या २४८ असून बाधित गोठ्यांची संख्या ३३ आहे.

Web Title: Unpleasant incidents of loss in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.