अनावश्यक सेवांनी मोबाईल धारकांच्या खिशाला झळ
By Admin | Updated: December 21, 2015 01:58 IST2015-12-21T01:58:20+5:302015-12-21T01:58:20+5:30
दूरसंचार कंपन्यांच्या वतीने सिमकार्डमार्फत विविध सेवा पुरविल्या जातात; पण अनेकदा त्याबाबत ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही.

अनावश्यक सेवांनी मोबाईल धारकांच्या खिशाला झळ
अनेक प्रलोभनांना बळी : अतिरिक्त सेवांचा भर
गोंदिया : दूरसंचार कंपन्यांच्या वतीने सिमकार्डमार्फत विविध सेवा पुरविल्या जातात; पण अनेकदा त्याबाबत ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही. यामुळे ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागत आहे. मागणी नसताना पुरविल्या जाणाऱ्या या सुविधांमुळे ग्राहक संभ्रमित होत असल्याचे दिसते.
दूरसंचार कंपन्यांवर अंकुश ठेवण्याकरिता ट्रायची निर्मिती करण्यात आली आहे; पण त्यांच्या दंडालाही कंपन्या ऐकत नसल्याचेच दिसून येत आहे. सध्या संपूर्ण नागरिकांना मोबाईल हा जीव की प्राण झाला आहे. त्यातही स्मार्टफोनमुळे इंटरनेट वापरण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचाच फायदा दूरसंचार कंपन्या घेत असून अतिरिक्त सेवांचा भार ग्राहकांवर लादला जात आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. ट्रायने याकडे लक्ष देत सिमकार्ड कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांद्वारे करण्यात येत आहे.
मोबाईल धारकांना सेवा देणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांनी विविध योजनांची प्रलोभने देत ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा प्रकार सुरू केला आहे. एखाद्या योजनेच्या लोभाला पडून ग्राहक सेवा घेतात; पण जेव्हा बिल द्यावे लागते, तेव्हा कपाळावर हात ठेवतात. मोबाईल सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलवर आपल्या मर्जीने अनेक सुविधा सुरू करीत आहेत. ग्राहकांची परवानगी न घेता आपल्याकडील उपलब्ध सेवा बहाल करतात. यात डायलटोन, भजन, राशी-भविष्य, संगीत, क्रि केट स्कोअर, इंटरनेट आदींचा समावेश आहे. या सुविधा ग्राहकांना पूर्वसूचना न देताच सुरू केल्या जात आहेत. यामुळे मोबाईल धारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
याबाबत ग्राहक सेवा केंद्रातून समाधानकारक उत्तरेही मिळत नसल्याने ग्राहकांद्वारे संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार जबरदस्तीचा असून कपात केलेली रक्कमही ग्राहकांना परत केली जात नाही. एक-दोन दिवसांनी पैसे जमा होतील, असे सांगितले जाते; मात्र तसे घडताना दिसत नाही. भारत संचार निगमबरोबरच आता अनेक दूरसंचार कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. त्यामुळे स्पर्धा निर्माण होऊन ग्राहकांना अधिकाधिक गंडविण्याचा गोरखधंदाच अनेक कंपन्यांनी सुरू केला आहे. (प्रतिनिधी)