गोंदिया : देवरी चिचगड मार्गावरील परसोडी या गावाजवळील नाल्यात स्कार्पिओ कार अनियंत्रित होऊन उलटली. या दुर्घटनेत चार वर्षीय मुलीसह आई व आजोबा यांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी प्राथमिक उपचारानंतर तिघांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे. हा अपघात सोमवार (दि. ६) रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान घडला.
स्कार्पिओ कार (एमएच ३५ एम ०८२४) ही चिपोटा व ककोडी क्षेत्रातिल लोकांना घेऊन देवरीकडून ककोडीकडे जात होती. दरम्यान, परसोडी गावाजवळील नाल्यात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कार्पियोअनियंत्रित होऊन झाडाला आदळून पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचा पार चेंदामेंदा झाला.
या भीषण दुर्घटनेत लीना अजय कुमार ताराम (वय ३, रा. पांढरापाणी) तसेच तिची आई सारनबाई अजय ताराम (वय ३२), आजोबा ग्यासाराम गोखरू उईके, राहणार चिपोटा या तिघांचा मृत्यू झाला तर स्कार्पिओमधील अन्य मुशफिर कुरेशी (वय २२), ओमप्रकाश सोनजल (वय १६) दोघेही राहणार ककोडी तसेच वाकेश्वरी घनश्याम उईके (वय २३) राहणार चिपोटा हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर चिचगळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोंदियाला हलविण्यात आले आहे. तिन्ही मृतकांचे चिचगड येथे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले असून घटनेचा तपास चिचगड पोलीस करीत आहेत.