पाण्याची टाकी कोसळून दोन महिला जखमी
By Admin | Updated: July 19, 2015 01:28 IST2015-07-19T01:28:55+5:302015-07-19T01:28:55+5:30
जवळील ग्राम करंजी येथे पाण्याची टाकी कोसळून त्याखाली दबल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता दरम्यान ही घटना घडली असून ...

पाण्याची टाकी कोसळून दोन महिला जखमी
करंजी येथील घटना : दोषींवर कारवाईची मागणी, पोलिसात तक्रार दाखल
कालीमाटी : जवळील ग्राम करंजी येथे पाण्याची टाकी कोसळून त्याखाली दबल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्या. शुक्रवारी (दि.१७) सकाळी ७ वाजता दरम्यान ही घटना घडली असून यातील एका महिलेला गोंदियातील डॉ. बजाज यांच्या हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, आमगाव तालुक्यातील ग्राम करंजी येथे सकाळी ७ वाजता दरम्यान गावातील महिला पाणी भरत असताना अचानक टाकी कोसळली. घटनेदरम्यान गावातीलच आशा मुकेश बागडे (२३) व पुस्तकला तेजराम हुकरे (४२) कोसळलेल्या भिंतीखाली दबून जखमी झाल्या. तर टाकीतील पाण्याच्या प्रवाहाने तेथे खेळत असलेला गुलाब काशीराम पालीवाल (१२) हा चिमुकला वाहत रस्त्यावर आला. यातील जखमींना तातडीने गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सदर टाकीला लिकेज असल्याने पाणी वाहत राहत असे. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी गर्दी करायचे असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत ग्राम पंचायतला वेळोवेळी सुचना देऊनही पक्की टाकी तयार करण्यात आली नाही असे येथील नागरिकांनी सांगितले.
दरम्यान उपचारानंतर पुस्तकला हुकरे यांना सुट्टी देण्यात आली.तर आशा बागडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना डॉ. बजाज यांच्या हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. (वार्ताहर)
दोषींवर कारवाईची मागणी
ग्रामपंचायत करंजी येथील लोकसंख्या अडीच हजारच्या जवळपास आहे. येथील पाण्याची टाकी २०-२५ वर्षे जुनी आहे. या टाकीद्वारे वॉर्ड क्र.२ ला पाण्याचा पुरवठा होत असून याचा १५० लोकांना लाभ मिळतो. मागील १० वर्षांपासून टाकी जर्जर असल्याने तिची थातूरमातूर डागडुजी करून काम चालविले जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र कधीही यापासून धोका होण्याची शक्यता टाळता येत नसल्याने नवीन टाकी तयार करण्यासाठी सरपंच पंचफुला बागडे यांना सांगण्यात आले होते. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही. करिता प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तंटामुक्त समिती सदस्य गणेश हुकरे, रामेश्वर शेंडे, श्रीराम शेंडे यांनी केली आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
सदर घटनेसंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसह आमगाव पोलिसांत रविवारी (दि.१८) जखमींच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली आहे. तसेच खंड विकास अधिकारी मून यांनी चौकशीचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले असल्याची माहिती आहे.