दोन महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:23+5:30
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लेखाशिर्षाच्या गोंधळाने बराच गाजला होता. या गोंधळामुळे शिक्षकांचे वेतन कोषागार व वेतन पथक कार्यालयात अडले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कुठलीही हालचाल किंवा उपाय योजना केली नाही.

दोन महिन्यांपासून प्राथमिक शिक्षकांचे वेतन थकले
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील ६५ खासगी प्राथमिक शाळेतील २८० शिक्षकांचे वेतन शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे.यामुळे सणासुदीच्या काळात शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे.
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न लेखाशिर्षाच्या गोंधळाने बराच गाजला होता. या गोंधळामुळे शिक्षकांचे वेतन कोषागार व वेतन पथक कार्यालयात अडले होते. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी शिक्षण विभागाने कुठलीही हालचाल किंवा उपाय योजना केली नाही. अखेर विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदिया च्यावतीने लेखाशिर्षाच्या गोंधळा संदर्भात १९ आॅगस्टला लेखाअधिकारी कार्यालय, विभागीय कोषागार कार्यालय नागपूर व शिक्षण उपसंचालक कार्यालयात भेट देऊन हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.
वेतनाच्या समस्येबाबत विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ शाखा गोंदियाचे जिल्हा संगठन प्रमुख बालकृष्ण बालपांडे, संगठन सचिव पंचभाई, उपाध्यक्ष अभिषेक अग्रवाल, वेतन पथक प्रतिनिधी बरडे, कोषागार प्रतिनिधी मेश्राम, संघाचे अध्यक्ष मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये या सर्वांच्या पाठपुराव्यामुळे जुलै महिन्याचे पगार २५ तारखेपर्यंत होणार असे आश्वासन तिन्ही कार्यालय प्रमुखांनी दिले होते. गोंदिया वेतन पथक कार्यालयातील कर्मचाऱ्यांसंबधी शिक्षण उपसंचालक मेंढे व वरिष्ठ लेखाधिकारी काळे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजून सांगितली. तेव्हा लवकरच कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे देण्यात आले होते.
या भेटीनंतर शिक्षण विभाग गोंदियातर्फे शिक्षकांच्या वेतनासंदर्भात कुठलीही अपेक्षित कार्यवाही केली नाही. तसेच गोंदिया वेतन पथक कार्यालयातर्फे वेतनाचे संभाव्य बजेट सुध्दा पुणे येथील कार्यालयात सादर केले नाही.
त्यामुळे शिक्षकांच्या पुढील महिन्याच्या वेतनासाठी निधी उपलब्ध झाला नाही. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या एक तारखेला वेतन अदा करण्यात यावे असे आदेश आहे. पण यानंतरही शिक्षण विभाग गोंदियाच्या लेटलतीफ कार्यामुळे शिक्षकांच्या वेतनाला विलंब होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात दोन दोन महिन्याचे वेतन थकले असल्याने शिक्षकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. प्राथमिक शिक्षकांचे थकीत दोन महिन्याचे वेतन तातडीने अदा न केल्यास कुटुंबीयांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाने दिला आहे.