२० वर्षापूर्वीचे निवारे कुचकामी
By Admin | Updated: July 19, 2014 23:59 IST2014-07-19T23:59:44+5:302014-07-19T23:59:44+5:30
सालेकसा तालुक्याच्या निर्मितीला ३३ वर्षे लोटली आहेत. परंतू इतक्या वर्षात या तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, पाऊस अंगावर घेत भर रस्त्यावरच बसगाड्यांची

२० वर्षापूर्वीचे निवारे कुचकामी
विजय मानकर - सालेकसा
सालेकसा तालुक्याच्या निर्मितीला ३३ वर्षे लोटली आहेत. परंतू इतक्या वर्षात या तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊन, पाऊस अंगावर घेत भर रस्त्यावरच बसगाड्यांची वाट पाहात उभे राहावे लागते. या परिसरातील इतर गावात बनलेल्या प्रवासी निवाऱ्यांची एवढी दुर्दशा झाली आहे की तिथे प्रवाशांना बसणेही शक्य नाही. २० वर्षापूर्वी बांधलेले अनेक ठिकाणी निवारे आता कुचकामी ठरत आहे.
तालुका मुख्यालय असल्यामुळे जिल्हा व इतर तालुका कार्यालयांशी कार्यालयीन व इतर कामानिमित्त संपर्क व ये-जा करण्याचा व्याप वाढला. त्यामुळे प्रवासी संख्या वाढली व बस आणि इतर प्रवासी वाहनांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. आज परिस्थिती अशी आहे की, प्रवाशांच्या व वाहनांच्या रांगा लागल्या असतात परंतु प्रवाशांना थांबण्यासाठी किंवा बसेसना सोयीस्कर जागेवर ठेवण्यासाठी बस स्थानक बनले नाही. तालुक्याचे ठिकाण असूनही बस स्थानक नसलेल्या मोजक्याच तालुक्यांमध्ये सालेकसाचा समावेश होतो.
जवळपास २० वर्षांपूर्वी तालुक्यात सालेकसा आणि गोवारीटोला या दोन ठिकाणी प्रवासी निवारे बनविण्यात आले होते. परंतु ते एकदा बनविल्यानंतर त्यांची दुरुस्ती व देखभाल कधीच करण्यात आली नाही. परिणामी गोवारीटोला येथील प्रवासी निवारा एवढा जीर्ण झाला की, त्याची तूटफूट होऊन घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे तो प्रवाशांच्या कामाचा राहीला नाही. सालेकसा येथील प्रवासी निवारा असा आहे की, तेथे प्रवासी न बसता तो सडकछाप मजनुंचा अड्डा बनलेला आहे. तालुका ठिकाण असल्याने प्रवाशांची संख्या शेकडोच्या संख्येत असते. मात्र छोटासा प्रवासी निवारा असताना तो ही सोयीस्कर नाही.
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात प्रवाशांची तर मोठी फजिती होते. प्रसंग आल्यावर रस्त्यावरील दुकानात आसरा घ्यावा लागतो. परंतु दुकानवालेसुद्धा प्रवाशांना आसरा देत नाही. जास्त वेळ थांबू देत नाही. नाईलाजाने प्रवाशांना रस्त्यावर वेळ काढून बस किंवा खासगी वाहनांची वाट बघावी लागते. कालांतराने सालेकसा-आमगाव आणि सालेकसा-चांदसूरज मार्गावर, साकरीटोला मार्गावर तसेच साकरीटोला मार्गावर काही ठिकाणी प्रवाशी निवारे बनविण्यात आले. परंतू ते आता कुचकामी ठरले आहेत.
पानगाव येथील प्रवासी निवारा मुख्य चौकापासून दूर असून तेथे प्रवासी थांबत नाही. याचा गैरकायदा घेत शेजारच्या शेतकऱ्याने प्रवासी निवाऱ्यात शेतीउपयोगी सामान ठेवले आहे. त्यात नेहमी म्हशी, रेडेही बांधून ठेवतो. त्यामुळे निवारा प्रवाशांचा की जनावरांचा असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.