जड वाहतूक बंद करा
By Admin | Updated: May 7, 2016 01:48 IST2016-05-07T01:48:05+5:302016-05-07T01:48:05+5:30
जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली.

जड वाहतूक बंद करा
विविध मागण्या : जिल्हा काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
देवरी : जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी तालुका काँग्रेस कमिटीची सभा घेण्यात आली. या सभेत छत्तीसगड राज्यातील छुरीया, ककोडी, चिचगड, देवरीमार्गे ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावे. गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना मारहाण करणाऱ्या आरोपीस त्वरित अटक करण्यासंदर्भात येत्या ७ मे रोजी गोंदिया येथे काढण्यात येणाऱ्या धडक मोर्चा संबंधात आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या संबंधात चर्चा करुन नंतर सर्व संमतीने देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना एक निवेदन जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सादर केले.
या निवेदनात छत्तीसगड राज्यातील छुरीया, ककोडी, चिचगड ते देवरी मार्गे चालणाऱ्या सर्व ओव्हरलोड वाहतूक त्वरित बंद करण्यात यावे. कारण हा मार्ग एकपदरी रस्ता आहे. या मार्गावरुन आरटीओचा कर वाचविण्याकरिता दररोज छत्तीसगड राज्यातील छुरीयावरुन २०० ते ५०० जड वाहतूक होते. त्यामुळे या मार्गाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. तरी ही जड वाहतूक त्वरित बंद करावे. तसेच केंद्र व राज्य शासनानुसार देवरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनिय झाली आहे. या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे, विद्युत बिल माफ करावे तर मनरेगा मार्फत सर्व शेतकऱ्यांचे रोवणी, मळणी व इतर कामे करण्यात यावे. शेतकऱ्यांना दुष्काळ निधी हेक्टरी २५ हजार रुपये देण्यात यावे आणि त्यांना नि:शुल्क बियाणे देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे म्हटले आहे. सदर मागणी त्वरित पूर्ण न झाल्यास या मागणीला धरुन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
शिष्टमंडळात जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहेषराम कोरोटे, माजी आ. रामरतन राऊत, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, देवरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, जि.प. सदस्य माधुरी कुंभरे, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, पं.स. सदस्य लकनी सलामे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)