क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:05 IST2018-06-25T22:05:40+5:302018-06-25T22:05:54+5:30
लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.

क्रांतीचे खरे प्रतिबिंब म्हणजेच साहित्य
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरीटोला : लेखन व्यक्तीच्या जडणघडनेत महत्वाची भूमिका बजाविते. तसेच लेखनीतून साकार झालेल्या साहित्यातून क्रांती घडू शकते. हे ध्यानात घेऊन साहित्यिकाने एखाद्या मृत शब्दात इतकी ताकद भरायला हवी की समाज जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी केले.
बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्य मंडळाच्या शाखेचे पुनर्गठण करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तंटामुक्त समितीच्या सभागृहात सदर कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा.मिलिंद रंगारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वासुदेव रहागंडाले , सौंदड येथील कवी चंदू पाथोडे, सुखचंद वाघमारे, युवा कवी पवन पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक सुखचंद वाघमारे यांनी मांडले. त्यानंतर शाखाध्यक्ष देवेंद्र रहागंडाले यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. प्रा. मिलिंद रंगारी यांनी जिल्ह्यातील झाडीबोली चळवळीच्या कार्याचा आढावा घेतला.
याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, झाडीबोली आपल्या अस्मितेचे प्रतिक आहे. बोलीमुळे आपल्या पुर्वजांची वाणी जतन करू शकतो. राष्ट्रसंतांनी झाडीपट्टी प्रदेशावर अपार प्रेम केले आणि या बोलीचा सुगंध आपल्या साहित्यातून सर्वदूर पसरविला. या वेळी वरोरा येथील आचार्य ना.गो. थुटे यांनी पाठविलेला ग्रंथ संच बोरकन्हार शाखेला बंडोपंत बोढेकर यांनी प्रदान केला.
यावेळी झालेल्या कवी संमेलनात प्रा. मिलिंद रंगारी यांनी झाडीपट्टीला मानवंदना करणारी ‘झाडीची माती’ ही कविता सादर केली. तर सुशील खापर्डे यांनी ‘रित खराब हाय’ ही झाडीची कविता ऐकविली. तसेच देवेंद्र रहागंडाले यांनी ‘नायलॉनच्या रस्सीवर’ या कवितेतून शेतकऱ्यांचे दु:ख मांडले.
दंडार कलावंत ग्यानीराम कटकवार यांनी ‘आम्ही मायबाप पापी’ या कवितेतून मुलींच्या बापाची व्यथा मांडली. तर राजेश कटरे यांनी ‘इस्कूलचा पयला दिवस’ या झाडीबोली कवितेतून बालपणाच्या शाळेच्या आठवण करून दिली. रमणदास बांबोर्डे यांच्या ‘अडसर नाही आणू, चंदू पाथोडे यांनी ‘माझा बाप’ या सामाजिक जाणिवेच्या कवितेने उपस्थितांना रिझविले. युवा कवी पवन पाथोडे यांनी चारोळ्या सादर केल्या.
त्यानंतर आपल्या स्वरचित ‘मायमाऊली या कवितेचे गायन करून रसिसकांना मंत्रमुग्ध केले. संचालन अनिल शहारे यांनी केले. आभार सुशील खापर्डे यांनी मानले.